घराच्या स्वप्नांना महागाईचा डंख, व्यापारी संकुलाच्या दरातही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:12+5:30
कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्रोल दरातील वाढीमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडत असताना दुसरीकडे बरेचसे परप्रांतीय मजूर कोरोना काळानंतर महाराष्ट्रात परत आले नाही.

घराच्या स्वप्नांना महागाईचा डंख, व्यापारी संकुलाच्या दरातही वाढ
संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या पाच महिन्यांत बांधकाम साहित्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे नवीन घर खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. केवळ घरच नाही, तर व्यावसायिक सदनिकांसाठीही आता ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ महिनाभरात अचानकपणे दुप्पट झाली. त्यामुळे निवास आणि व्यापारी सदनिकांचे दर प्रति चौरस फूट ५०० ते ७०० रुपये वाढणार आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्रोल दरातील वाढीमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडत असताना दुसरीकडे बरेचसे परप्रांतीय मजूर कोरोना काळानंतर महाराष्ट्रात परत आले नाही.
त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मजूर टंचाई आणि मजुरीत वाढ, यालाही तोंड द्यावे लागत आहे. रेरा कायद्यानुसार आधी बुकिंग केलेल्या फ्लॅटधारकाला कोणतीही दरवाढ न करता मुदतीत फ्लॅट ताब्यात देण्याचे बंधन विकासकावर असते. मात्र, बांधकाम साहित्याच्या दरवाढीवर शासन कोणतेही निर्णय आणत नाहीत. दरवाढ टाळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत; परंतु सध्या तरी नवीन बुकिंग करण्यासाठी आणि नवीन प्रकल्पासाठी दरवाढ अनिवार्य असल्याचे येथील क्रेडाई (वणी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स असो.) चे अध्यक्ष किरण दिकुंडवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या सर्व दरवाढीचा परिणाम बांधकाम उद्योगावर झाला असून बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, बांधकाम खर्चाच्या दरात प्रति चौरस फूट ५०० ते ७०० वाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सरकारही या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी काहीच करत नाही.
- किरण दिकुंडवार, अध्यक्ष, क्रेडाई.