राज्याच्या कला संचालकपदी यवतमाळचे डॉ. किशोर इंगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:12 IST2025-06-27T16:11:46+5:302025-06-27T16:12:48+5:30
तरुण वयात घातली यशाला गवसणी : ग्राफिटी चित्रकलेत विशेष हातखंडा

Dr. Kishore Ingle of Yavatmal appointed as the state's art director
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल १९ वर्षांनंतर राज्य कला संचालनालयाला नवीन कलासंचालक मिळाले आहेत. कलाक्षेत्रात ग्राफिटी कलाकृतीचा अटकेपार झेंडा रोवणारे डॉ. किशोर इंगळे यांच्या गळ्यात कला संचालनालयाच्या कला संचालकपदाची माळ पडली आहे. त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी यशाला गवसणी घातली.
डॉ. किशोर इंगळे यांचे मूळगाव दारव्हा तालुक्यातील गणेशपूर आहे. त्यांनी गावातच प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले. बोरीअरब येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत व टागोर विद्यामंदिरात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. बालपणापासूनच त्यांना कलेची आवड होती. दिग्रस येथून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर, नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला व प्रा. मनीषा पाटील व प्रा. प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनात बी.एफ.ए., एम.एफ.ए. आणि पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. याच महाविद्यालयात ते अध्यापक म्हणून २०११ पासून कर्तव्य बजावत आहेत.
ग्राफिटी चित्रकलेत डॉ. किशोर इंगळे यांचा विशेष हातखंडा असून, देश-विदेशातील कला प्रदर्शनाने अनेकांना भुरळ घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केल्यानुसार कलासंचालक या पदावर डॉ. इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
१९ वर्षानंतर कलासंचालक मिळाले
एक-दोन नव्हे तर तब्बल १९ वर्षांपासून कला संचालनालयाला कलासंचालक नव्हते. एम. बी. इंगळे यांच्यानंतर कलासंचालक म्हणून इंगळेच मिळाले आहेत. सिनेट सदस्य असल्याने डॉ. किशोर इंगळे यांना विद्यापीठ कामाचा अनुभव आहे. राज्याला कलासंचालक मिळाल्याने कला शिक्षणाला अधिक चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.