दुहेरी हत्याकांडातील सुपारीचा मास्टर मार्इंड टप्प्यात
By Admin | Updated: October 29, 2014 22:56 IST2014-10-29T22:56:35+5:302014-10-29T22:56:35+5:30
दुहेरी हत्याकांडाची पाच मारेकऱ्यांना सुपारी देणारा मास्टर मार्इंड नांदेड पोलिसांच्या टप्प्यात असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

दुहेरी हत्याकांडातील सुपारीचा मास्टर मार्इंड टप्प्यात
पोलीस तपासाला वेग : माहूर येथील युगुलाचे खूनप्रकरण
यवतमाळ : दुहेरी हत्याकांडाची पाच मारेकऱ्यांना सुपारी देणारा मास्टर मार्इंड नांदेड पोलिसांच्या टप्प्यात असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. दरम्यान निरपराध व्यक्ती घटनेत गोवला जाऊ नये म्हणून पोलीस बारकाईने तपास करीत असल्याचेही सांगण्यात आले.
अभियांत्रिकीची विद्यार्थिनी निलोफर खालीद बेग रा.पुसद आणि शाहरुख फिरोज खान पठाण रा. उमरखेड यांचे छिन्नविच्छन अवस्थेतील मृतदेह माहूर येथील रामगड किल्ल्यावर १० आॅक्टोबर रोजी आढळून आले होते. मात्र मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलेही पुरावे सोडले नसल्याने या दोघांचा खून नेमका कोणी केला, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. कॉल डिटेल्स् आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही अपयशच हाती आले. त्यामुळे नांदेड पोलिसांनी गोपनीय माहितीवर लक्ष केंद्रीत केले. त्यामध्ये राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर (२०) याचे नाव पुढे आले. खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये निलोफरचा मोबाईल हाती लागल्याने राजू उर्फ राजा हा हत्याकांडात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. कोठडी दरम्यान त्याने घटनेची कबुली देऊन साथीदारांची नावे उघड केली. तसेच या हत्याकांडासाठी शेख जावेद शेख हुसेन उर्फ पेंटर रा. माहूर याने सुपारी घेतली होती. ती त्याने आपल्याकडे सोपवून तोही घटनेत सहभागी झाल्याचे पोलिसांपुढे उघड केले. त्यावरून शेख जावेद शेख हुसेन उर्फ पेंटर, रंगराव शामराव बाबटकर, शेषराव उर्फ पिंटू शामराव बाबटकर, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे सर्व रा. माहूर यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत हे दुहेरी हत्याकांड सुपारीतून झाल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तबच झाले. मात्र सुपारीचा मास्टर मार्इंड कोण याचा उलगडा झाला नव्हता. पाचही मारेकऱ्याच्या सांगण्यावरून सुपारी देणारा मास्टर मार्इंडची ओळख पटविण्यात आली आहे. केवळ निरपराध व्यक्ती घटनेत गोवला जाऊ नये म्हणून पोलीस बारकाईने तपास करीत आहे. कोणत्याही क्षणी त्याला अटक केली जाऊ शकते, अशी माहिती नांदेड पोलिसातील पिराजी गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या आरोपींना नेमकी किती रुपयांची सुपारी दिली होती. याचाही शोध पोलीस घेत आहे. तसेच या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळून खुनासाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून शाहरुखचा मोबाईल फोन, मनी पॉकेट, विदेशी चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
समाजमन सुन्न करणाऱ्या या युगुलाच्या खून प्रकरणाचा छडा लागला. आरोपींनाही अटक झाली. मात्र या सुपारीचा सूत्रधाराला अद्यापही अटक झाली नाही. मात्र लवकरच तोही पोलिसांच्या जाळ्यात अडकेल, अशी माहिती नांदेड पोलिसांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)