महिला रक्तदात्यांची संख्या कमी, कारण आपल्याला ठाऊक आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:07 IST2025-01-30T18:06:50+5:302025-01-30T18:07:53+5:30
Yavatmal : महिलांना लागते सर्वाधिक रक्त; तरी महिलांचाच नकार ठरला चिंताजनक

Do you know why the number of female blood donors is low?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रक्तदान करताना पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे बाळंतपण आणि विविध ऑपरेशन करताना महिलांना रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. महिलांना रक्ताची आवश्यकता असताना, रक्तदान करण्यात महिलाच माघारल्या आहेत. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत.
अनेक महिलांना रक्तदान केल्यामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो, हा गैरसमज आहे. तर, काही महिला सुईला घाबरतात. रक्त म्हणजे शरीरात ताकतच राहणार नाही. असाही गैरसमज आहे. याशिवाय अनेक महिलांना हिमोग्लोबीन कमी होण्याचीच अधिक भीती असते. यातून रक्तदान करण्यासाठी महिलाच पुढे येत नाही. यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला रक्तदात्यांची संख्या कमी आहे. यवतमाळ जिल्ह्यात हे प्रमाण तर १ ते दोन टक्के म्हणावे इतके कमी आहे.
२४ महिलांचे रक्तदान
एका रक्तपेढीत वर्षभरात २४ रक्तदान करणाऱ्या महिला रक्तदान करताना महिला रक्तदात्यांची संख्या पुरुषाच्या तुलनेत नगण्य आहे. यवतमाळात एका रक्तपेढीत वर्षभरात केवळ २४ महिला रक्तदात्यांची नोंद करण्यात आली आहे.
व्यायामाचा अभाव
महिलांमध्ये अनियंत्रित वजन असण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय व्यायामाचा अभाव असतो. यामुळे त्यांना अनेकवेळा अस्वस्थ वाटते. याशिवाय रक्तदान करतानाही महिला रक्तदानासाठी पुढे येत नाही.
मासिकपाळी, प्रसूती, तणाव, हिमोग्लोबीन
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबीनची कमतरता असते. त्यामुळे सुदृढ महिलाही रक्तदान करण्यास घाबरतात. याशिवाय मासिकपाळी, प्रसूती, तणाव आणि घरच्या लोकांची परवानगी या प्रमुख कारणामुळे रक्तदान करण्यासाठी महिला पुढे येत नाहीत.
शंभरामागे दोन महिला
१०० रक्तदात्यांनंतर दोन महिला मोठ्या कठीण परिस्थितीत पुढे येतात. या महिलांनी स्वतःचा अनुभव सांगितल्यानंतरही रक्तदान होत नाही.
"रक्तदान केल्यानंतर शरीरात नव्याने रक्त तयार होते. याशिवाय अनेक आजार जातात. स्किनचा प्रॉब्लेम नाहीसा होतो. याशिवाय शरीरातील आळस नाहीसा होतो."
- संकेत लांबट, रुग्णसेवक, रक्तदाता.