दारव्हा पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने करा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:55 IST2017-10-12T21:55:26+5:302017-10-12T21:55:48+5:30
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी पडला. त्यातही दारव्हा आणि यवतमाळमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे.

दारव्हा पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने करा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड
यवतमाळ : यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी पडला. त्यातही दारव्हा आणि यवतमाळमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने हे काम जलदगतीने करावे, अशा सुचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, दारव्हाचे न.प.मुख्याधिकारी धीरज गोहाड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरवे उपस्थित होते.
दारव्हा पाणी पुरवठा योजना ही 34 कोटी रुपयांची आहे. येथील काम जलदगतीने होण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला आदेश द्यावे. तसेच या योजनेसाठी स्वतंत्र अभियंता द्यावा. पाण्याची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्यापूर्वी हे काम होणे अत्यंत महत्वाचे आहे, असे महसूल राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले.
तर कंत्राटदाराने गतीने काम सुरु न केल्यास तसा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या त्वरीत सांगा. यवतमाळ आणि दारव्हा पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करा. 30 किमी पैकी जी मोकळी जागा आहे, त्या जागेवर त्वरीत काम सुरू करा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगर पालिका प्रशासन आणि कंत्राटदाराला दिल्या. यावेळी त्यांनी शहरापर्यंतची पाईपलाईन किती किलोमीटर आहे, पाईपचा व्यास किती, पंपींग किती प्रस्तावित केले, दर दिवशी किती लिटर पाणी पंप करणार आहे, वॉटर ट्रिटमेंट प्लाँट ची क्षमता किती, साठवण करण्यासाठी टँक किती आहे, प्रत्येक कामाची सद्यस्थिती काय, योजना त्वरीत पूर्ण होण्यासंदर्भात काय नियोजन केले आदी बाबींचा आढावा घेतला. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, दारव्हा येथील नगरसेवक आदी उपस्थित होते.