खुनाच्या दोन घटनांनी हादरला जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:20+5:30

सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुऱ्यावर एक मृतदेह आढळला. त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी मृतकाचे नाव अमर कुमार (२५), रा. औरंगाबाद, बिहार, असे असल्याचे महामार्गावरून जाणाऱ्या दुसरा ट्रकचालक वेदराम ठाकूर, रा. भिलाई, छत्तीसगड यांनी पोलिसांना सांगितले. मृत अमर कुमार याच्यासोबत वेदराम ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे पोलिसांना सांगितले.

The district was shaken by two incidents of murder | खुनाच्या दोन घटनांनी हादरला जिल्हा

खुनाच्या दोन घटनांनी हादरला जिल्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/उमरखेड : जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही सत्र काही केल्या कमी व्हायला तयार नाही. शनिवारी उमरखेड येथे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला दगडाने ठेचून ठार करण्यात आले. या पाठोपाठ यवतमाळ शहरातील लोहारा भागातील इंदिरानगरमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाने मायलेकावर चाकूने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 
सविता नरेंद्र जाधव रा. इंदिरानगर, लोहारा असे मृत महिलेचे नाव आहे. दिनेश नरेंद्र जाधव (१८) हा गंभीर जखमी आहे. इंदिरानगरमध्ये आरोपी पवन जयंत चेके रा. इचोरी हा पोहोचला. त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीवरून सविता जाधव या महिलेसोबत वाद घालणे सुरू केले. त्यानंतर संतापलेल्या पवनने धारदार चाकू काढून सवितावर सपासप वार केले. आईच्या मदतीला धावून आलेल्या दिनेश जाधव याच्यावरही पवनने चाकूने हल्ला केला. तो गंभीर जखमी झाला. सर्वांसमक्षच ही घटना घडत होती. जखमी दिनेशने लोहारा पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार अनिल घुगल यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तासाभरातच गुन्ह्यातील  आरोपी पवन जयंत चेके याला अटक केली. 
वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात जखमी दिनेशच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रथमदर्शनी पैशाच्या देवाण-घेवाणीतून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. 
उमरखेड तालुक्यातील चिल्ली सुकळी (ज) गावाजवळ  तुळजापूर-नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मृताचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. 
सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुऱ्यावर एक मृतदेह आढळला. त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी मृतकाचे नाव अमर कुमार (२५), रा. औरंगाबाद, बिहार, असे असल्याचे महामार्गावरून जाणाऱ्या दुसरा ट्रकचालक वेदराम ठाकूर, रा. भिलाई, छत्तीसगड यांनी पोलिसांना सांगितले. मृत अमर कुमार याच्यासोबत वेदराम ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे पोलिसांना सांगितले. मृतक अमर कुमार हे ट्रकमध्ये (सीजी ०७ एएक्स ३७७२) कोळसा घेऊन बिलासपूर (छत्तीसगढ) येथून परळीकडे निघाले होते. 

जिल्ह्यात १५ दिवसांतच पाच खून

- गुन्हेगारी कारवायांमुळे यवतमाळ शहरासह जिल्ह्याची कुप्रसिद्धी होत आहे. शरीर दुखापतीच्या गुन्ह्यात यवतमाळ शहर महानगरांच्याही पुढे आहे. येथे ग्रामीण व शहरी भागातील खुनाचे सत्र सातत्याने कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यापूर्वी यवतमाळातील आर्णी मार्गावर सर्वांसमक्ष दोघांना निर्दयपणे घाव घालून ठार करण्यात आले. त्यानंतर बिटरगाव पोलीस ठाण्यातील सावळेश्वर येथे पत्नी व प्रियकराने पतीचा गळा घोटला. 
- शनिवारी यवतमाळ शहरासह उमरखेडमध्ये खुनाच्या दोन घटना एकाच दिवशी घडल्या. खुनाच्या गुन्ह्यात आरोपी अटक होत असले तरी त्यांच्यामध्ये कायदेशीर कारवाईचा धाक दिसत नाही. 

श्वान पथक बोलाविले
- यवतमाळ येथून फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञ व श्वान पथक बोलावण्यात आले आहे. मात्र मारेकरी कोण व खुनाचे कारण काय हे गूढ अजूनही कायम आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे, एपीआय संदीप गाडे, पीएसआय विनीत घाटोळ व चमू तपास करीत आहे.

 

Web Title: The district was shaken by two incidents of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.