जिल्हा मध्यवर्ती बँक भाजपाच्या ताब्यात
By Admin | Updated: June 10, 2017 00:56 IST2017-06-10T00:56:02+5:302017-06-10T00:56:02+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्षपदी अखेर अपेक्षेनुसार भाजपाचे बाभूळगाव येथील संचालक अमन गावंडे विजयी झाले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँक भाजपाच्या ताब्यात
प्रभारी अध्यक्षपदी अमन गावंडे विजयी : वसंत घुईखेडकर पराभूत, काँग्रेस-राष्ट्रवादी फुटली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्षपदी अखेर अपेक्षेनुसार भाजपाचे बाभूळगाव येथील संचालक अमन गावंडे विजयी झाले आहेत.
२५ मतदार असलेल्या जिल्हा बँकेत गावंडे यांना १५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांना अवघी दहा मते मिळाल्याने पराभूत व्हावे लागले. अवघ्या तीन संचालकांच्या बळावर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळविल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आणि विशेषत: सहकार क्षेत्रात भाजपाचे वजन वाढल्याचे मानले जाते.
दहा वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या मनीष पाटील यांना २५ पैकी २२ संचालक विरोधात गेल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या रिक्त पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा बँकेच्या प्रभारी अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अमन गावंडे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून वसंत घुईखेडकर यांनी नामांकन दाखल केले. दोन दिवसांपर्यंत २२ संचालकांची एकजूट कायम होती. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मानणाऱ्या संचालकांची संख्या सर्वाधिक आहे. ते पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून येईल, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांची एकजूट भंगली. त्यांच्यातील गटबाजी उफाळून आली. या गटबाजीच्या बळावर भाजपाचे अमन गावंडे प्रभारी अध्यक्ष म्हणून बँकेवर निवडून आले. त्यांना १५ मते मिळाली. त्यांच्या पक्षाच्या तिघांशिवाय वणी विभागातील चार संचालक उघडपणे भाजपाच्या बाजूने होते. हे संचालक गेल्या काही महिन्यांपासून वणीतील भाजपा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या साथीला आहेत. त्यामुळे ते भाजपासोबतच राहतील, असा सुरुवातीपासूनच अंदाज होता, तो शुक्रवारी खराही ठरला.
गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामभवनावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद येथील आमदार मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वात संबंधित प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तेथूनच थेट बारामतीपर्यंत संधान बांधून राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याचे निश्चित झाले. या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सोपविण्यात आली होती. परंतु काँग्रेसची संपूर्ण साथ न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरले.
माणिकरावांनी विश्वासात घेतले नाही, बैठकीला बोलविले नाही, माणिकरावांचा एकही संचालक नसताना जिल्हा बँकेत त्यांची लुडबुड कशासाठी ? अशी कारणे पुढे करीत काँग्रेसमधील शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार आदी नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. माणिकरावांना धडा शिकविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर संचालकांच्या भक्कम पाठबळामुळेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचे प्रभारी अध्यक्ष निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसमधील एका गटाची भाजपाला अशीच भक्कम साथ लाभली. त्यांच्या या साथीने विधानसभेपाठोपाठ यावेळी जिल्हा बँकही भाजपाने सर केली. या निवडणुकीत काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचीही मते फुटल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आदेश पक्षाच्या संचालकांनी झुगारुन भाजपाला साथ दिल्याने नेत्यांचे पक्षातील वजन कमी तर झाले नाही ना, अशी शंका राजकीय गोटात वर्तविली जात आहे.
कारवाईच्या भीतीने भाजपाला साथ
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी पक्षासोबत फितुरी करून सत्ताधारी भाजपाला साथ देण्यामागे कारवाईची भीती हे कारण सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा बँकेवर संचालक मंडळ कायम आहे. या काळात बँकेत अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्याच्या विविध तक्रारी, याचिका व त्या अनुषंगाने चौकश्याही झाल्या. परंतु बहुतांश चौकशा संचालकांनी आपले ‘वजन’ वापरुन मॅनेज केल्या. प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास हे गैरप्रकार अफरातफर, गैरव्यवहारात परावर्तीत होण्यास वेळ लागणार नाही. तसे झाल्यास हातकड्या लागण्याची भीती या संचालकांना होती. म्हणूनच त्यांना सत्ताधारी भाजपा-शिवसेना युती सरकारचे संरक्षण हवे होते. भाजपाचा अध्यक्ष झाल्यास बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई होणार नाही, २१ सदस्य संख्येमुळे अनेकांना पुढे संधी मिळणार नाही, अशांना मुदतवाढ देऊ या सारखी कारणे पुढे करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांचा तीन सदस्यीय भाजपाला पाठिंबा मिळवून दिला गेला. त्यासाठी एका ज्येष्ठ संचालकाची अनेक महिन्यांपासूनची धडपड रहस्यमय ठरली.
केवळ तीन मतांच्या बळावर केला कब्जा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सुरुवातीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यातीलच तीन संचालक फुटून भाजपावासी झाल्याने जिल्हा बँकेत भाजपाच्या संचालकांची संख्या आता या तिघात मोजली जाते. केवळ तीन संचालक असताना भाजपाने जिल्हा बँकेवर वर्चस्व निर्माण केले आहे. या तिघांपैकी एक प्रभारी अध्यक्ष तर दुसरे उपाध्यक्ष (क्र. १) आहे. तिसरे संचालक माजी राज्यमंत्री असून दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात २०१९ ची तयारी करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १००० कोटींच्या ठेवी असलेल्या जिल्हा बँकेच्या तिजोरीची चाबी भाजपाच्या हाती आली आहे. याचे श्रेय भाजपाला कमी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील गटबाजीला अधिक दिले जात आहे.
‘लोकमत’चे भाकित खरे ठरले
अध्यक्ष मनीष पाटील यांना पायउतार करण्यासाठी २२ नाराज संचालकांनी एकजुटीने मोट बांधली होती. त्यांची ही एकजूट अध्यक्ष निवडीपर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान राहणार असल्याचे भाकित ‘लोकमत’ने वर्तविले होते. हे भाकित शुक्रवारी तंतोतंत खरे ठरले. अंदाजानुसार या २२ संचालकांमध्ये फूट पडली. त्यामुळे १५ विरुद्ध १० असा सामना रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.