मटणाचा स्वाद वाढवतोय वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 15:44 IST2021-09-24T15:40:18+5:302021-09-24T15:44:10+5:30
नॉनवेज खाणाऱ्या लोकांत मटणाची वेगळीच क्रेज आहे. मात्र, या मटणावरून चिकणी गावात पतीने पत्नीला गंभीर मारहाण केली. तर पाटणबोरी येथे दोन नातेवाईकांचीच हाणामारी झाली.

मटणाचा स्वाद वाढवतोय वाद
यवतमाळ : श्रावणात कसाबसा धीर धरलेल्या खवय्यांना आता मटण खाण्याची घाई झाली आहे. मात्र, मटणाचा हा स्वाद घराघरात वादही वाढवताना दिसत आहे. गुरुवारी चिकणी गावात मटणासाठी पत्नीला गंभीर मारहाण करण्यात आली. तर पाटणबोरी येथे दोन नातेवाईकांचीच हाणामारी झाली.
जिल्ह्यात एकाच दिवशी मटणासाठी हाणामारीच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकणी गावात घडली. रवींद्र बाबाराव चव्हाण याने घरी मटण आणले. मात्र मटण शिजवून देण्यास पत्नीने नकार दिला. परंतु मटणाची घाई सुटलेल्या रवींद्रला राग आला. याच कारणातून त्याच्यासह अन्य तिघांनी वंदना रवींद्र चव्हाण या महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केली. काठीने तिच्या डोक्यावर प्रहार झाल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली. वंदनाने लाडखेड पोलीस ठाण्यात धाव घेवून चार जणांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे नोंदविले.
दुसरी घटना पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणबोरी येथे घडली. येथे नागोराव चिनय्या गुंडेवार आणि अशोक नामदेव धोत्रे या दोन नातेवाईकांचीच मटणासाठी हाणामारी झाली. अशोक धोत्रे हा दारू पिवून नागोरावच्या घरापुढे आला आणि ‘तुला मीच मटण दिले’ असे म्हणून लागला. मात्र मटण काही फुकट दिले नाही त्यासाठी मी तुला पैसे दिले असा प्रतिवाद नागोरावने केला. हा वाद वाढून हाणामारी झाली. यात नागोरावच्या डोक्यावर दगड लागल्याने तो जखमी झाला. नागोरावच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोकविरुद्ध गुन्हा दाखल केला.