अपंगत्व मोजणारी मशीन बंद

By Admin | Updated: October 14, 2014 23:25 IST2014-10-14T23:25:22+5:302014-10-14T23:25:22+5:30

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगत्वाचे प्रमाण मोजणारी मशीन (नर्व्ह कंडक्शन) गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहे. याकडे रुग्णालय व्यवस्थापन दुर्लक्ष करीत

Disability Counting Machine Off | अपंगत्व मोजणारी मशीन बंद

अपंगत्व मोजणारी मशीन बंद

रुग्णांना हेलपाटे : शासकीय रुग्णालयाचा कारभार ‘जैसे थे’च
यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगत्वाचे प्रमाण मोजणारी मशीन (नर्व्ह कंडक्शन) गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहे. याकडे रुग्णालय व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असून रुग्णांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहे.
येथील शासकीय रुग्णालयात बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी प्रत्येक आठवड्यात अपंगत्वाचे प्रमाण निर्धारित करण्यात येते. त्यासाठी खास अपंगत्व मोजमाप करणारी मशीन येथे उपलब्ध आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणामुळे ही मशीन बंद आहे. त्यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना तपासणी न करता परत जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अपंग व्यक्तींची आॅनलाईन नोंदणी सुरू आहे. त्यामुळे आता गेल्या पाच-सहा वर्षात येथील रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाण मिळालेल्या सर्वच रुग्णांना या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे बोगस अपंगांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. याचमुळे या मशीनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन या मशीनची त्वरित दुरुस्ती करावी व संबंधित रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयातील विविध मशिनरीजबाबत नेहमीच असा प्रकार घडतो. कधी सीटी स्कॅन मशीन बंद असते तर कधी एक्स-रे मशीन बंद असते. त्यामुळे जिल्हाभरातून या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकांना विविध चाचण्या खासगीतून कराव्या लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
रुग्णांना येथील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक हीसुद्धा अतिशय वाईट असते. हे रुग्णालय रुग्णांसाठी आहे की रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी हाच प्रश्न अनेकदा निर्माण होतो. ओळख असल्याशिवाय येथे योग्य उपचारसुद्धा रुग्णांना मिळत नाही. याबाबत अनेक वेळा विविध संघटना, रुग्णांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधींनी ओरड करूनसुद्धा रुग्णालयाच्या व्यवस्थापनात कोणतीही सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्हाभरातून या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची हेळसांड सुरूच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disability Counting Machine Off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.