नवरात्रोत्सवाची धूम, उद्यापासून माॅं अंबेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:21+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तिकारांनी घाम गाळून आई दुर्गेच्या मूर्ती घडविल्या आहेत. मंगळवारी या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कलावंत मग्न झाले होते. तर मंडळांचे कार्यकर्ते आपआपल्या मंडपांचे आकर्षक देखावे खुलविण्यात दंग झाल्याचे पहायला मिळाले.  कोरोनाचे सावट काहीसे कमी झालेले असले तरी यावर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे.

Dhoom of Navratri festival, Mother Ambe's awakening from tomorrow | नवरात्रोत्सवाची धूम, उद्यापासून माॅं अंबेचा जागर

नवरात्रोत्सवाची धूम, उद्यापासून माॅं अंबेचा जागर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या उत्सवप्रियतेचे ज्वलंत प्रतीक असलेला दुर्गोत्सव गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आलेले मरगळ झटकून यंदा नियम पाळत हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी शहरासह जिल्हाभरातील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 
गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तिकारांनी घाम गाळून आई दुर्गेच्या मूर्ती घडविल्या आहेत. मंगळवारी या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कलावंत मग्न झाले होते. तर मंडळांचे कार्यकर्ते आपआपल्या मंडपांचे आकर्षक देखावे खुलविण्यात दंग झाल्याचे पहायला मिळाले. 
कोरोनाचे सावट काहीसे कमी झालेले असले तरी यावर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात १७४० मंडळांनी सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा केला होता. २०२० मध्ये ही संख्या निम्म्याहून कमी म्हणजे ५११ एवढीच होती. तर यावर्षी मंगळवारपर्यंत केवळ ११८ मंडळांनी उत्सवाची परवानगी मिळविली आहे. 
कोरोना नियमावलीमुळे यंदाही दुर्गोत्सव साजरा होतो की नाही, अशी भीती निर्माण झालेली असतानाच राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून मंदिर उघडण्याची परवानगी दिली. त्यासोबतच नियम पाळून सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासही मुभा दिली. परंतु यंदा राज्य शासनासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही सार्वजनिक दुर्गोत्सवात काही नियम जारी केले आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी गरबा नृत्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यासही मर्यादा घालण्यात आली आहे. तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंचीच स्थापित करता येणार आहे. मंडळांमध्ये मास्क घालून, कोविड लसीकरण झालेल्यांनाच परवानगी राहणार आहे. गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. मात्र देवीविषयीची आपली श्रद्धा जपून आणि कोरोनाची नियमावली पाळून हा उत्सव साजरा करता येणार आहे. गुरुवारपासून पुढचे नऊ दिवस जिल्हाभर नवरात्रोत्सवाची, आईच्या आरत्यांची धूम राहणार आहे.   यंदा मंडळे लसीकरण कॅम्पसह विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार आहे. 
दरम्यान, पोलीस प्रशासनही सज्ज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांनी मंगळवारी नगरभवनात शांतता समितीची बैठक घेतली. 

मंगळवारपर्यंत ११८ सार्वजनिक मंडळांना परवानगी 
- दुर्गोत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपल्याने उत्सवाच्या परवानगीसाठी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयात धाव घेतली होती. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचाही यात समावेश होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळलाच गेला पाहिजे, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे मंडळांनी सादर केलेले कागदपत्र काळजीपूर्वक पडताळूनच परवानगी दिली जात होती. त्यामुळेच मंगळवारपर्यंत केवळ ११८ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांना परवानगी मिळाली. बुधवारी आणि गुरुवारी परवानगी प्राप्त मंडळांची संख्या वाढणार आहे. 

 

Web Title: Dhoom of Navratri festival, Mother Ambe's awakening from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.