इच्छामरण आंदोलन
By Admin | Updated: December 1, 2015 06:34 IST2015-12-01T06:34:17+5:302015-12-01T06:34:17+5:30
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने भर टाकण्याचेच काम केले आहे. पीक पैसेवारी, शेतमालाचा

इच्छामरण आंदोलन
यवतमाळ : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने भर टाकण्याचेच काम केले आहे. पीक पैसेवारी, शेतमालाचा भाव, कृषी पंपाचा वीज पुरवठा यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लोकजागृतीच्या मंचाच्या पुढाकारात इच्छामरण आंदोलन केले. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून ती पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी ही प्रेतयात्रा मध्येच अडविल्याने एका सभेनंतर या आंदोलनाची सांगता झाली.
शेती आणि शेतकरी या मुद्यावर प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खुद्द पालकमंत्री संजय राठोड यांनी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यातील पीकस्थिती सर्वोत्तम असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६७ टक्के इतकी पीक पैसेवारी काढली. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहीला. आक्षेप घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वत:च्या मतदारासंघासह केवळ आठ तालुक्यातील पीक पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी काढावयास लावली. त्यामुुळे उर्वरित आठ तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. पालकमंत्री पीकस्थिती उत्तम असल्याचे सांगत असतानाच नेर तालुक्यात दोन हजार हेक्टरवरचे सोयाबीन काढलेच नाही. शेंगा व दाने नसल्याने या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरविला. सततच्या नापिकीमुळे उमरखेड तालुक्यात दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री राठोड यांनी शेतकरी कुटुंबाला भेट देण्याऐवजी त्यांच्या मतदारसंघात संगीतरजनीचे आयोजन केले. यावरून पालकमंत्र्यांची बेजबाबदारी दिसून येते. यंत्रणेला शेतकरीहितासाठी राबविण्याऐवजी दडपशाहीचे धोरण राबवित असल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेनेचे नेते मराठवाड्यात शेतकरी कुटुंबाची सांत्वना करत असतानाच शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी पुढे येण्याचे सौजन्य दाखवित नाही. उलट आंदोेलन होऊ नये यासाठी जमाबंदी आदेश लागू केला.
जिल्हा प्रमुखाकडून पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री त्यांच्या सत्तेचा वापर हा शेतकरीहितासाठी नव्हे तर, त्यांचा आवाज दडपण्यासाठी, न्याय्य मागण्यांसाठीचे आंदोलन चिरडण्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला.
आझाद मैदान येथून आंदोलनाला सुरूवात झाली. ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा बसस्थानक चौक, दत्त चौक आणि नंतर तिवारी चौकात पोहोचली. हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांसोबतच शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आंदोलकांनी तिवारी चौकातच सभा घेऊन आंदोलनाची सांगता केली. या आंदोलनासाठी लोकजागृती मंचाचे देवानंद पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, घनश्याम अत्रे, चंद्रशेखर चौधरी, सिंकदर शहा, हेमंत कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)