ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांमध्ये अफरातफर ! दाते महिला बँकेचे ठेवीदार पुन्हा उपोषणाच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:59 IST2025-10-20T19:57:14+5:302025-10-20T19:59:34+5:30
Yavatmal : महिला बँकेच्या ५० ते ६० ठेवीदारांनी रविवारी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली. थकीत मोठ्या कर्जदारांच्या घरासमोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन व आमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन त्यांना दिले.

Depositors' hard-earned money is in trouble! Depositors of Date Mahila Bank are on hunger strike again
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला बँकेच्या ठेवीदारांनी पैसे परत मिळावे, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयापुढे उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी दिवाळीपूर्वी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटही डीडीआर यांना दिला. परंतु, अजूनही पैसे परत न मिळाल्याने ठेवीदार उपोषण करणार आहे.
महिला बँकेच्या ५० ते ६० ठेवीदारांनी रविवारी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली. थकीत मोठ्या कर्जदारांच्या घरासमोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन व आमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन त्यांना दिले. ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांमध्ये अफरातफर करणाऱ्यांना अभय देण्यासाठी आरटीआय अर्जा अंतर्गत माहिती देण्यात आली नाही, अशी माहिती आमदारांना दिली.
सक्तीची कर्ज वसुली करावी, आवश्यक एनओसी तत्काळ घेण्यात यावी, ठेवीची संपूर्ण रक्कम मिळावी यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मांगुळकर यांनी ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी मुकुंदराव दारुण्डे, दिगंबर मेसेवार, राजेस तिवारी, अरुण डोलारकर, रामभाऊ धोंगडे, मंगला ठोकळ, शोभा गुल्हाने, रेखा बुटले, सुलभा राऊळ, सावरकर, गोगटे, पतोडे, शीतल तोटे, काळे, प्रकाश हिंगलासपुरे, अरुण सानप, चव्हाण, लाभसेटवार, वामन मसराम, वाघमारे, मालोकर, शिरभाते, भागवत, मून, मोरे उपस्थित होते.
दिवाळीचे दिवे पेटलेच नाही
अवसायक व प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे पैसे परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे ठेवीदारांच्या घरी दिवाळीचे दिवे पेटले नाही, अशी माहिती दिली. एकूणच ठेवीदारांमध्ये सहकार विभागाप्रती असंतोष निर्माण झाला आहे.