अखेरच्या दिवशी उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

By Admin | Updated: October 13, 2014 23:26 IST2014-10-13T23:26:44+5:302014-10-13T23:26:44+5:30

गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी शक्ती प्रदर्शन करित सातही मतदारसंघातील उमेदवारांनी रॅली काढली. जनमताचा भक्कम पाठिंबा मिळत

The demonstrations of the candidates on the last day | अखेरच्या दिवशी उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

अखेरच्या दिवशी उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

प्रचारतोफा थंडावल्या : गोपनीय प्रचार सुरू, आमिषांची सरबत्ती
यवतमाळ : गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी शक्ती प्रदर्शन करित सातही मतदारसंघातील उमेदवारांनी रॅली काढली. जनमताचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र उभे करण्याची धडपड शेवटच्या क्षणापर्यंत करण्यात आली. आता गठ्ठा मतांवर लक्ष केंद्रीत करून आमिषांची सरबत्ती उमेदवारांकडून केली जात आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र पालटल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच आज रिंगणात असलेल्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी गेल्या १५ दिवसांपासून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची कसोटी लागली होती. उमेदवारांनी काढलेल्या रॅलीची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आपापल्या परीने होत आहे. शेवटच्या दिवशी काढण्यात आलेली रॅलीही काठावरची मते आपल्या बाजुने वळविण्याचा प्रयत्न असतो. यानंतर खऱ्या अर्थाने शेवटची बोलणी सुरू होते. त्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंंत उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्नांची शर्थ केली जाते. जिल्ह्यातील सातही विधानसभेत लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, प्रमुख उमेदवार आपला जोरकस आजमावत आहे.
वणी विधानसभेत काँग्रेसचे वामनराव कासावार, शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय देरकर, भारतीय जनता पार्टीकडून संजयरेड्डी बोदकुरवार, मनसेकडून राजू उंबरकर यांच्यात चुरस आहे. राळेगावमध्ये काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके, भाजपाचे अशोक उईके, शिवसेनेचे उत्तम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद धुर्वे यांच्यात लढत आहे. यवतमाळ विधानसभेत काँग्रेसचे राहुल ठाकरे, भाजपाचे मदन येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बाजोरिया, शिवसेनेचे संतोष ढवळे आणि बसपाचे मो. तारीक मो. समी यांच्यात लढत आहे. शिवाय शेतकरी विकास आघाडीचे डॉ. रवींद्र देशमुखही रिंगणात आहेत. दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर, काँग्रेसचे देवानंद पवार अशी लढत आहे. आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, भाजपाचे राजू तोडसाम, शिवसेनेचे संदीप धुर्वे, राष्ट्रवादीचे विष्णू उकंडे यांच्यात चुरस आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक, काँग्रेसचे सचिन नाईक, शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांच्यात लढत आहे. उमरखेडमध्ये काँग्रेसचे विजय खडसे, भाजपाचे राजेंद्र नजरधने, शिवसेनेचे शिवशंकर पांढरे, राष्ट्रवादीचे मोहन मोरे, बसपाचे नारायण पाईकराव यांच्यात लढत आहे. या सर्व उमेदवारांकडून आता शेवटच्या ४८ तासात मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार आहे. निवडणुकीतील वैऱ्याची रात्र म्हणून उमेदवारासोबतच प्रत्येक कार्यकर्ता दक्ष असतो. मोठ्या प्रमाणात या ४८ तासांमध्ये घडामोडींना वेग येतो. मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर याकाळात दबाव वाढतो. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The demonstrations of the candidates on the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.