सूर्यग्रहणाच्या पूजेला गेलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू, घाटंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:43 IST2020-06-21T18:42:55+5:302020-06-21T18:43:23+5:30
संजय शिवाप्रसाद अग्रहारी (४३) आणि आदित्य संजय अग्रहारी (१२) असे या घटनेतील मृत पिता-पुत्राचे नाव आहे.

सूर्यग्रहणाच्या पूजेला गेलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू, घाटंजीतील घटना
घाटंजी (यवतमाळ) : सूर्यग्रहणादरम्यान पूजापाठ करण्यासाठी नदीपात्रावर गेलेल्या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. येथील बेलोरा मार्गावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
संजय शिवाप्रसाद अग्रहारी (४३) आणि आदित्य संजय अग्रहारी (१२) असे या घटनेतील मृत पिता-पुत्राचे नाव आहे. सूर्यग्रहण असल्यामुळे अग्रहारी कुटुंबीयांनी नदीकाठावरील जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या शनिमंदिरात ग्रहणातील पूजापाठ-विधी आयोजित केला होता.
पूजापाठ आटोपल्यावर आंघोळ करण्यासाठी काही जण वाघाडी नदीपात्रात उतरले. मात्र, आंघोळ करीत असताना खोल पाण्यात बुडून दोघांचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
दोघांना वाचविण्यात यश
या पूजाविधीदरम्यान एकंदर चार जण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते. ते चारही जण बुडू लागले, त्यावेळी लगतच्याच जलशुद्धीकरण केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी नवीन भोयर यांनी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नामुळे दोघांना जीवदान मिळाले. मात्र संजय व आदित्य अग्रहारी या दोघांचा मृत्यू झाला.