दुष्काळी वर्षात दुग्ध व्यवसाय संजीवनी
By Admin | Updated: March 22, 2015 02:03 IST2015-03-22T02:03:19+5:302015-03-22T02:03:19+5:30
सततची नापिकी आणि त्यातून वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

दुष्काळी वर्षात दुग्ध व्यवसाय संजीवनी
स्वप्नील कनवाळे पोफाळी
सततची नापिकी आणि त्यातून वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. यंदा तर खरीप आणि रबी हंगामही उद्ध्वस्त झाला. अशा स्थितीत पोफाळी परिसरातील शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय संजीवनी ठरत आहे. दुधाच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग सापडला असून दूध संकलनासाठी खासगी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
उमरखेड तालुक्यात यावर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. मात्र पोफाळी परिसरातील अनेक शेतकरी गत काही वर्षांपासून दुग्ध व्यवसायात उतरले आहे. अशा दुष्काळी वर्षात दुग्ध व्यवसाय संजीवनी ठरला आहे. गाई-म्हशीचे दूध संकलीत केले जाते. दुधाला चांगला भाव मिळत असून दुधापासून विविध पदार्थ तयार करूनही विकले जात आहे. पोफाळी कारखाना येथे दुध संकलनासाठी खासगी केंद्र उघडण्यात आले. त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळत आहे.
याठिकाणी पिंपरी, पोफाळी, कळमुला, तरोडा, जनुना, हातला, पळशी येथील शेतकरी दुध घेवून येतात. दररोज शेकडो लिटर दुधाचे संकलन होते. या दुधामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाची पहाट उगवली आहे. या शेतकऱ्यांचा आदर्श घेवून इतरही शेतकरी आता दुग्ध व्यवसायाकडे वळत असल्याचे पोफाळी परिसरात दिसत आहे. शेतकरी स्वत:च संकटावर मात करून आपला प्रगतीचा मार्ग शोधत आहे.
पोफाळी येथील गजानन डोळम म्हणाले, दुधामुळे आम्हाला प्रगतीचा मार्ग सापडला आहे. तर कळमुलाचे दिगंबर सावंत म्हणाले, रोज रोख पैसे हातात येते. शेतीला पूरक व्यवसाय असल्याने काहीच कठीण जात नाही. प्रत्येक शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायाकडे वळायलाच हवे. डॉ. गणेश राठोड म्हणाले, आम्ही अनेक वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करतो आता संकलनाची सुविधाही झाली आहे.