माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह 6 जणांना सक्तमजुरी, 2013 मध्ये केलेली जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 19:26 IST2022-12-12T19:24:22+5:302022-12-12T19:26:28+5:30
२०१३ मध्ये कापसाच्या भावावरून केलेल्या आंदोलनावेळी दगडफेक व जाळपोळीची घटना घडली होती.

माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह 6 जणांना सक्तमजुरी, 2013 मध्ये केलेली जाळपोळ
पांढरकवडा (यवतमाळ) - २०१३ मध्ये कापसाच्या भावावरून केलेल्या आंदोलनावेळी दगडफेक व जाळपोळीची घटना घडली होती. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह सहा जणांना तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तर इतर चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल सोमवारी न्यायालयाने दिला.
पांढरकवडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ नोव्हेंबर २०१३ रोजी कापसाचा हर्रास सुरू होता. यावेळी माजी आमदार राजू तोडसाम यांचेसह कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी व्यापारी भाव बरोबर देत नसल्याचा तसेच काट्यात हेराफेरी होत असल्याचा आरोप करीत राडा केला व कापसाचा हर्रास बंद पाडला. त्यानंतर ते पेट्रोलची कॅन व लाठ्याकाठ्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात घुसले व इमारतीची तोडफोड केली तसेच पेट्रोल टाकून इमारतीला आग लावली. या तोडफोडीत तसेच आगीत बाजार समितीच्या खुर्च्या, भिंतीवरचे पंखे, एलईडी स्क्रीन यासह ३ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान झाले होते. यावेळी एक लाख बारा हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते. या आंदोलनाच्या गदारोळात बाजार समितीत असलेला राष्ट्रध्वजही जाळल्याची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
त्यावरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर भादंवि कलम १४३, १४७, १४८, ४३५, ४३६, ३७९, ४५० सहकलम १४९, कलम १३५ मुंबई पोलीस ॲक्ट, सहकलम १४९, शासकीय मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलम कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर चालले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश पी.बी. नाईकवाड यांनी माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह नंदकिशोर पांडुरंग पंडित, विकेश विठ्ठल देशट्टीवार, किशोर हरिभाऊ घाटोळ, सुधीर माधवराव ठाकरे आणि नारायण बाबाराव भानारकर या सहा जणांना तीन वर्षे सक्त मजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर आरोपी गिरिश केशवराव वैद्य, संजय पुरुषोत्तम वर्मा, सुभाष कर्णजी दरणे व सुनील बालाजी बोकीलवार यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील म्हणून ॲड. चंद्रकांत डहाके व ॲड. प्रशांत मानकर यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले.