उलटलेला ट्रक काढताना क्रेन पलटला, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:26+5:30
कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.

उलटलेला ट्रक काढताना क्रेन पलटला, एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : उलटलेला ट्रक सरळ करताना अवजड क्रेनही उलटली. या विचित्र अपघातात एक मजूर क्रेनखाली दबून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी यवतमाळ-आर्णी मार्गावरील बोथबोडन फाट्याजवळ घडली.
प्रेमदास लक्ष्मण पाटील (६०, रा. आंबेडकरनगर, डोर्ली यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुसरी क्रेन बोलावली अन् तीही उलटली
- उलटलेली क्रेन आणि ट्रक काढण्यासाठी दुसरी क्रेन बोलवण्यात आली. मात्र, तीही उलटली. सुदैवाने या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही. कामगाराच्या मृत्यूप्रकरणी संजय सुखदेव पाटील यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.