पाटाळा येथील नवीन पुलाला पडल्या भेगा, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:11 IST2023-07-28T18:09:10+5:302023-07-28T18:11:02+5:30

स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

Cracks in the new bridge at Patala, fear among motorists | पाटाळा येथील नवीन पुलाला पडल्या भेगा, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

पाटाळा येथील नवीन पुलाला पडल्या भेगा, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

वणी (यवतमाळ) : करंजी ते नागभीड-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील वणी येथून वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाला पहिल्याच पुरात भेगा पडल्या आहेत. दोन ठिकाणी पूल एका बाजुने तीन ते चार इंच दबला आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवास करताना घाबरत आहेत. पुलाखाली पावसाचे व धरणाचे पाणी असल्याने तेथे पुलाला काही धोका निर्माण झाल्यास पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे.

वणी तालुक्यातून चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी वणी ते वरोरा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग नुकताच तयार झाला आहे. या महामार्गावर जुन्या पाटाळा पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधून नवीन राष्ट्रीय महामार्ग आणखी मजबूत तयार करण्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न पुल नादुरुस्त झाल्याने फसला आहे.

मार्च २०२३ मध्ये पाटाळा येथील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र पुलाचे काम पूर्ण होताच, पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरूवात झाली होती. त्यात सिमेंट बांधकाम करताना तेथे पाण्याचा वापरदेखील केला गेला नाही. मात्र आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता आणि त्यावेळी मे महिन्यातील कडक उन्हं होते. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाच्या सर्व भागात भेगा पाडण्यास सुरूवात झाली होती. त्यातच शुक्रवारी पुल काही ठिकाणी दोन ते तीन इंच दबलेला आढळला. दरम्यान, ही बाब लक्षात येताच, कंत्राटदाराने ताबडतोब चुरी आणून ते लेव्हल केले व पुलाला पडलेल्या भेगासुद्धा बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कायम अवजड वाहनांची वाहतूक होणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची स्थिती अवजड वाहनांची वाहतूक झेपणारी आहे काय? असा प्रश्न या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना भेडसावत आहे.

पुलाला कोणताही धोका नाही

पाटाळा गावापासून वणीकडे येताना बनविलेल्या पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले आहे. मी आताच पाहणी करून आलो. अॅप्रोचमध्ये इश्यू आला आहे. सेच्युरेशनमुळे हा प्रकार झाला आहे. पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही - अभिजीत जिचकार, वरिष्ठ अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

पुणे, मुंबईकडे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत हा मार्ग अरूंद आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे काय? असा प्रश्न पडतो. त्यात या रस्त्यावर बनवले जाणारे नवीन पूल ही आमच्यासारख्या सातत्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. या पुलाच्या कामाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. 

- दिनेश भोईर, ग्रामस्थ-पाटाळा

Web Title: Cracks in the new bridge at Patala, fear among motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.