विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:36 IST2021-12-16T18:31:08+5:302021-12-16T18:36:17+5:30
मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) परिसरातील जंगलात प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
विशाल दत्ता आगीरकर (२८, रा. राणी धानोरा, ता. आर्णी) व पूनम संजय राऊत (१८, रा. बोंडगव्हाण, ता. माहूर, जि. नांदेड), अशी मृत प्रेमी युगुलाची नावे आहेत. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परिसरातील गुढाई टेकडीजवळ दोघांचेही मृतदेह आढळले. गुढा येथील पोलीस पाटील नितीन खोडे यांनी याबाबत पारवा पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार गजानन शेजूलकार, हवालदार सुरेश येलपूलवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.
मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पारवा पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
गुरुवारी दुपारी घटनास्थळी पूनमची आई आणि विशालचे वडील दाखल झाले होते. त्यांनीच दोघांची ओळख पटविली. दरम्यान, विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघांच्याही लक्षात आले असावे, त्यामुळे दोघेही सोमवारीच घर सोडून गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर बुधवारी ते या परिसरात आले. येथेच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.
घटनास्थळी आढळली विषाची बाटली
पारवा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथे विषाची रिकामी बाटली, दोघांच्याही चपला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पर्स आदी वस्तू आढळल्या. विषाची बाटली आढळल्याने त्यांनी आत्महत्याच केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला.
बोंडगव्हाण येथील तरुणी संदर्भात सिंदखेड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार नाही. मात्र, तरुणीने गुढाई टेकडीजवळ आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर गावात माहिती घेतली. मृत विशाल आणि पूनम दोघेही सख्खे मावस भाऊ-बहीण असल्याचे समजले. बोंडगव्हाण आणि राणी धानोरा या गावातील अंतर साडेतीन किलोमीटर एवढे आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- भालचंद्र तिडके, सहायक पोलीस निरीक्षक, सिंदखेड, ता. माहूर