जिल्हा मुुख्यालयात कापसाचे दर पाडले

By Admin | Updated: December 18, 2015 02:51 IST2015-12-18T02:51:36+5:302015-12-18T02:51:36+5:30

खासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे.

Cotton prices were hit at the district headquarter | जिल्हा मुुख्यालयात कापसाचे दर पाडले

जिल्हा मुुख्यालयात कापसाचे दर पाडले

नियंत्रण सुटले : यवतमाळात ४२०० तर, इतरत्र ४४०० रूपये
रूपेश उत्तरवार यवतमाळ
खासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे. यामध्ये क्विंटलमागे २०० रूपयांची तफावत आहे. शेतकऱ्यांची यातून अक्षरश: लूट होत आहे. मात्र त्यावर चाप लावण्यात सहकार विभागाला सपशेल अपयश आले आहे. कापूस विक्रीसाठी येणारे वाहन थेट व्यापाऱ्यांच्या दारात पोहोचत आहे. यामुळे बाजार समितीचा सेस बुडला आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये १० लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याची नोंद झाली आहे. खेडा खरेदीच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, याची नोंद नाही. जिल्हा मुख्यालयात परवाना नसताना अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. या खरेदीला आता उधाण आले आहे. कापसाची विक्री करण्यासाठी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी बोली बोलण्याचा सहकारचा नियम आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या आवारात कापसाची बोली लावली जात नाही. खासगी व्यापारी परस्पर जिनात कापूस घेऊन जातात. याची नोंद बाजार समितीकडे होत नाही. विशेष म्हणजे, बोली न लागल्याने व्यापारी मनमानी दराने कापसाची खरेदी करतात. हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. पणनची वाहने केवळ त्याला अपवाद ठरली आहेत. या गंभीर प्रकाराने बाजार समितीचा सेस दररोज बुडत आहे. याच संधीचा फायदा परवाना न घेतलेल्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
कुठलीही शासकीय प्रक्रिया न करता हे व्यापारी जिल्ह्याच्या ठिकाणी परस्पर कापसाची खरेदी करीत आहेत. यातून कापूस उत्पादकांची अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी बाजारात कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. यवतमाळमध्ये ३९०० ते ४२०० पर्यंत कापसाची खरेदी सुरू केली आहे. यवतमाळ वगळता लगतचे तालुके अमरावती, अचलपूर, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत आहेत. यामध्ये क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची तफावत आहे. लगतच्या तालुक्यांपेक्षा यवतमाळात अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. जिल्हा मुुख्यालयात शेतकऱ्यांची लूट होत असताना सहकार विभाग आणि बाजार समिती गप्प आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र यवतमाळात कापसाचे जुनेच दर शेतकऱ्यांवर लादले जात आहे.

Web Title: Cotton prices were hit at the district headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.