कापूसही रुसला; सोयाबीनला मिळतोय हमीपेक्षा कमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:52 IST2024-12-06T17:51:14+5:302024-12-06T17:52:10+5:30

शेतकऱ्याची चिंता वाढली : कापूस लागवडीचा खर्चही निघेना

Cotton also rotted; Soybeans are getting lower than guaranteed prices | कापूसही रुसला; सोयाबीनला मिळतोय हमीपेक्षा कमी भाव

Cotton also rotted; Soybeans are getting lower than guaranteed prices

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुसद :
शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूससोयाबीन सध्या चांगले भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, कापूससोयाबीनचा भाव वाढत आहे ही केवळ चर्चाच आहे. सोयाबीनला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.


पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापूस उत्पादन घेतले जाते. ही संख्या मोठी असली, तरी यंदाच्या वर्षात पूर व खराब वातावरणामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळाले नाही. शिवाय कमी उत्पादन असताना भाव देखील ३ हजार हजार ३०० पासून ४ हजार २०० पर्यंत एवढा कमी प्रति क्विंटलला मिळत आहे. मागील दसरा, दिवाळी सणापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे पुसद बाजार समितीचे आवारामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांच्या आडतीसमोर सोयाबीनचे ढीग दिसून येत आहेत. एकंदरच बाजारभाव हा ४ हजार २०० ते ३०० च्या वर जायला तयार नाही, तर आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तसेच ठेवले आहे. दुसरीकडे सोयाबीनवर शेतकऱ्यांनी अगोदरच उचल घेतलेली राहते, त्या उचलीची परतफेड करणे व नवीन ताळेबंद बसविणे यामध्ये बळीराजा गुंतलेला दिसतो. परंतु यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.


निसर्गाच्या लहरीपणामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुसद तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे बाजारातील दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी गत झाल्यामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला देखील उतारा कमी आला. त्यातच कापसालाही खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. मागील काही वर्षात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात हजार इतक्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही. शिवाय वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून प्रति किलो १२ रुपये वेचणीला खर्च येत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. 


आता अपेक्षा तुरीच्या पिकाकडून 
सध्या तुरीचे पीक जोमात बहरलेले आहे. तुरीच्या पिकातून तरी हाती काही पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. याचा फटका बहरुन आलेल्या तुरीच्या पिकाला बसू नये अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Cotton also rotted; Soybeans are getting lower than guaranteed prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.