CoronaVirus News: 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू होण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 19:34 IST2020-05-31T19:34:38+5:302020-05-31T19:34:50+5:30
CoronaVirus News: या बैठकीत 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करता येईल, असा सूर निघाला.

CoronaVirus News: 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू होण्याचे संकेत
दारव्हा (यवतमाळ)- राज्यस्तरावर गठीत केलेल्या शैक्षणिक सल्लागार समितीची आज ऑनलाइन बैठक मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चे संचालक व शैक्षणिक सल्लागार समितीचे सदस्य यांचेमध्ये पार पडली. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत उद्भवणारे प्रश्न व त्यावरील उपाय यावर विचार मंथन झाले. या बैठकीत 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करता येईल, असा सूर निघाला.
या सोबतच वसंत घुइखेडकर यांनी विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, अनुकम्पावरील नियुक्त्यांना मान्यता द्यावी, संच मान्यतेसाठी अधारकार्डाची सक्ती करू नये, डेप्युटेशनवर शिक्षकांना पाठविण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांनाच द्यावेत, ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ती भरती करावी, सेवकांची पदे भरावी, पदभरती शक्य नसल्यास कंत्राटी पद्धतीने भरती करावी, शाळेला संगणक शिक्षक द्यावा, शाळा निर्जंतुकीकरणाचे साहित्य पुरवावे इत्यादी मागण्या शासनाकडे रेटून धरल्या.
या सोबतच इतर सदस्यांनी सुद्धा चांगल्या सूचना केल्या. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री मा. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे सचिव विलास खारगे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, कपिल पाटिल, वसंत घुईखेडकर यवतमाळ, माध्यमिकचे शिक्षण संचालक मा. दिनकर पाटील, प्राथमिकचे शिक्षण संचालक मा. जगताप, डॉ. रमेश माशलकर, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, लातूरचे डॉ. अनिरुद्ध जाधव, औरंगाबादेच रजनीकांत गरूड, विवेक सावंत पुणे, रवींद्र फडणवीस नागपुर हे उपस्थित होते, असे संस्था चालक संघटनेचे प्रतिनिधी अनिल गायकवाड यांनी कळविले आहे.