CoronaVirus 36 people in Yawatmal's Qurantine cell hrb | CoronaVirus यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जण दाखल

CoronaVirus यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जण दाखल

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जणांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी 28 जण दिल्ली (निजामुद्दीन) येथील संमेलनाशी निगडीत आहेत. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 31 होती. यापूर्वीचे पाच असे एकूण 36 जण सद्यस्थितीत भरती आहेत. पाच जणांचे नमुने यापूर्वीच तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून बुधवारी भरती झालेल्या 31 जणांचे नमुने 2 एप्रिल ला तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. सर्वांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहेत.


निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 34 लोकांची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. यातील 28 लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.  तर उर्वरीत सहा नागरिक अद्यापही जिल्ह्यात परत आले नाही. हे सहा जण ज्या जिल्ह्यात गेले आहेत, तेथील प्रशासनासोबत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असून त्यांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 96 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात 230 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विदेशातून आलेले, निजामुद्दीन (दिल्ली) वरून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी. बाहेरून आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही, त्यांनी  त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus 36 people in Yawatmal's Qurantine cell hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.