CoronaVirus : यवतमाळात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् मदतीचा हातही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:10 IST2020-04-28T16:56:26+5:302020-04-28T18:10:23+5:30
CoronaVirus: कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

CoronaVirus : यवतमाळात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् मदतीचा हातही
यवतमाळ : नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे मुख्य काम. परंतु यवतमाळचे पोलीस या कामांसोबत २४ तास बंदोबस्त करून नागरिकांना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात मदतीचा हातही देताना दिसत आहे.
कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांच्यावतीने सील केलेल्या इंदिरानगर भागात दूध आणि ब्रेडचे ८०० पॅकेटस् अडचणीतील नागरिकांना वितरित करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे व अन्य पोलीस अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलिसांनी स्वत: त्या परिसरात फिरुन नागरिकांना दूध, ब्रेडचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्त ठेवणे हे पोलिसांचे काम असताना ते करून पोलीस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे. यवतमाळ पोलिसांचे या भूमिकेचे व मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.