कोरोना डेथ ऑडिट; 74 टक्के रूग्णांना आधीपासूनच आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST2021-06-18T05:00:00+5:302021-06-18T05:00:25+5:30
कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना डेथ ऑडिट; 74 टक्के रूग्णांना आधीपासूनच आजार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत आजही कायम आहे. अनेकांना या काळात आपला जीव गमवावा लागला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही पुरुषांचा समावेश सर्वाधिक आहे. किडनी, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हिपाटायटिस बी यासह इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. ही स्थिती अतिशय धोकादायक होती. या काळात रुग्णांना बेड मिळणेही मुश्कील झाले होते. शासकीयच नव्हे खासगी आरोग्य यंत्रणाही कोलमडली होती. हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.
७३ जणांचा ४८ तासांत मृत्यू
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण होते. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे अवलोकन केल्यास ही लाट किती घातक होती हे दिसून येते. एकूण एक हजार १६ जणांचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. यामध्ये रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जवळपास ७३ जणांचा रुग्णालयात दाखल होताच मृत्यू झाला. त्यांना बेड न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली.
सर्वात जास्त रक्तदाबाचे रुग्ण
कोरोना हा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना सहज ग्रासतो. हे शासकीय कोविड रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रक्तदाब हा कोरोना वाढविण्याला पूरक ठरणारा आहे.
मधुमेह यामुळेसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. मृत्यूमध्ये ९२ जणांना मधुमेह असल्यानेच कोरोना संसर्ग वाढून त्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार असलेल्या ११७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा रुग्णांवर कोरोना उपचारात लवकर प्रतिसाद मिळत नाही. धोका वाढत राहतो.