सर्वसामान्यांच्या सोयीसाठी समाधान शिबिराचे आयोजन
By Admin | Updated: September 12, 2015 02:20 IST2015-09-12T02:20:35+5:302015-09-12T02:20:35+5:30
सामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या बाबी ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुवर्ण जयंती महाराजस्व

सर्वसामान्यांच्या सोयीसाठी समाधान शिबिराचे आयोजन
यवतमाळ : सामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या बाबी ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली कामे ग्रामपातळीवरच करून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे गुरूवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषद सदस्य सोनबाजी मंगाम, पंचायत समिती सदस्य शारदा शिंदे, प्रताप आडे, सरपंच अभिजित शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
शासनाने शिबिराच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी ग्रामपातळीवर जाऊन सर्वसामान्यांची कामे करीत आहे. लोकशाही प्रणालीत नागरिक मालक असून शासन, प्रशासन या नागरिकांसाठी काम करते. शिबिराच्या माध्यमातून सदर काम खऱ्या अर्थाने दिसून येत आहे. सामान्यांच्या कल्याणासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. प्रत्येक नागरिकात कष्ट करण्याची ताकद आहे. आत्मविश्वासाने समोर गेल्यास प्रत्येकजण आपले भविष्य चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शासनाच्या विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांची माहिती दिली. घरकुल योजना, धडक सिंचन, वीज जोडणी आदी कामांना जिल्ह्यात गती आली असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीस उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमीका विषद केली.
शिबिरानिमित्त सावळी सदोबा येथे विविध शासकीय कार्यालयांची माहिती देणारे स्वतंत्र दालणे लावण्यात आली होती. या प्रत्येक दालणास भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दालणांचे उद्घाटन करण्यासोबतच माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)