बसस्थानक उद्घाटनाविनाच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:38 IST2019-07-07T22:37:38+5:302019-07-07T22:38:34+5:30
गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे.

बसस्थानक उद्घाटनाविनाच सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या बसस्थानकाचे काम सुरु होते. विविध कारणांमुळे बांधकाम पूर्णत्वास जाण्यास विलंब झाला. यात दोन-दोन पावसाळे, उन्हाळे, हिवाळे निघून गेले. प्रवाशांना या काळात उन्ह, वारा, थंडी, उष्णता, अंधाराचा सामना करावा लागला. रखरखत्या उन्हाळ्यात प्रवाशांना बसण्यास सावलीच नव्हती. अगेर प्रवाशांनी जबरदस्तीने या बसस्थानकात धाव घेतली.
वाहतूक नियंत्रक, विविध पासेसचे कार्यालय या ठिकाणी सुरू झाले आहे. कँटीन मात्र अद्याप सुरू झाली नाही. हे बसस्थानक ४२ लाख रुपयांत उभारण्या आले. तरी जागा आजच अपुरी पडत आहे. कंत्राटदाराने प्लाटफार्मसमोर जुन्या-नव्या इमारतीचे वेस्ट मटेरियल तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे नव्या वास्तूच्या सुंदरतेला गालबोट लागत आहे. बसस्थानकाचे उर्वरित काम बाकी आहे. ते कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी स्थानिक वेळापत्रक व यवतमाळवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलद बस, रातराणी, शिवशाही, स्लिपर कोच कोच आदींचे टाइमटेबल लावणे, या गाड्यांच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा लाखो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू निरूपयोगी ठरण्याची शक्यता आहे.
अंधार कायमच
येथे रात्री शेवटची अमरावती बस ९.३० ते १० वाजता ला येते. त्यावेळी बसस्थानकात अनेकदा अंधार असतो. बसस्थानकात अद्याप वीज, प्रकाशाची परिपूर्ण व्यवस्था नाही. राळेगाववरून लांब पल्ल्याच्या बस सुरू करता याव्या, याकलिता पाच नव्या बसला एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्राचार्य डॉ.अशोक उईके यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांनी आता या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याकडून प्रवाशांच्या अनेक अपेक्षा आहेत.