बोटोणी : नजीकच्या खेकडवाई कोलाम पोडात तापाच्या साथीची लागण झाली आहे. मात्र त्याकडे आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे़खेकडवाई येथे सुमारे ९० घरांची लोकवस्ती आहे. या वस्तीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापाची लागण झाली आहे. तेथील ग्रामस्थ तापाने फणफणत आहे़ शिवा आत्राम, रूख्माबाई आत्राम, सोनाबाई रामपुरे, गंगूबाई सुरपाम, रूपेश रामपुरे, तानेबाई रामपुरे, सुंदराबाई रामपुरे, वर्षा आत्राम, अस्मिता रामपुरे, प्रगती रामपुरे, निशा रामपुरे, प्रितेश रामपुरे, गिरजाबाई आत्राम, नितेश रामपुरे, शारदा आत्राम, रवी आत्राम आदींना दोन-तीन दिवसांपासून तापाची लागण झाली आहे़ गेल्या दोन-चार दिवसांपासून या रूग्णांना थंडी वाजून ताप येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ तेथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेतील १७ विद्यार्थ्यांपैकी सध्या केवळ चारच विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती आहे़ ही कोलाम वस्ती शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. तेथे बोटोणी येथील आरोग्य उपकेंद्रातून आरोग्य सेवा पुरविली जाते़ मात्र या उपकेंद्रात केवळ एकच परिचारिका कार्यरत असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. परिणामी रूग्ण खासगी डॉक्टर, मारेगाव, वणी, करंजी येथे जाऊन उपचार घेत आहेत़ आरोग्य विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे़ (वार्ताहर)
खेकडवाई येथे साथ रोगांची लागण
By admin | Updated: October 12, 2014 23:38 IST