दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी
By Admin | Updated: July 25, 2015 02:47 IST2015-07-25T02:47:48+5:302015-07-25T02:47:48+5:30
सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसने दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्याची एकही संधी सोडली नाही.

दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी
यवतमाळ : सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसने दारव्हा-नेरमध्ये शिवसेनेला शह देण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेसने आता या तालुक्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील दोन अभियंत्यांच्या बढतीचे ‘टेंडर’ घेऊन आणखी एक खेळी रचल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पहायला मिळतो. शिवसेनेचे पालकमंत्री असताना व त्यांचा दिग्रस-दारव्हा-नेर मतदार संघ असताना तेथे काँग्रेसकडून हेतुपुरस्सर परस्पर नियुक्त्या करून आणण्याचा प्रयत्न केला जातो. यवतमाळच्या बांधकाम कार्यकारी अभियंत्याकडे नेर, दारव्हा, बाभूळगाव, कळंब, घाटंजी या तालुक्यांची जबाबदारी आहे. नेर व दारव्हा हे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील तालुके यात समाविष्ठ आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता या महत्वाच्या पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा अशी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची मनिषा आहे. त्यासाठी पक्षातीलच सक्षम व मर्जीतील व्यक्तीला कामी लावले गेले आहे. या नेत्याची मुंबईतून साथ मिळते आहे. यवतमाळच्या पदावर सध्या असलेल्या अभियंत्याची बदली अथवा बढती होणे महत्वाचे आहे. हे अभियंते अलिाडेच आल्याने त्यांची बदली होणार नाही, याची जाणीव झालेल्या काँग्रेसने आता अभियंत्याला अधीक्षक अभियंतापदी तातडीने बढती मिळवून देण्याचे ‘टेंडर’ घेतले असल्याची चर्चा बांधकाम खात्यात आहे. सदर अभियंत्याने मात्र असे काही राजकीय प्रयत्न सुरू असल्याची बाब स्पष्टपणे नकारली आहे. त्यांच्या संभाव्य बढतीने रिक्त होणाऱ्या जागेवर मर्जीतील उपअभियंत्याला बसविले जाणार आहे. त्यासाठी या अभियंत्याला कार्यकारी अभियंतापदी तत्काळ बढती मिळवून देण्याचे दुसरेही ‘टेंडर’ घेतले गेले आहे. या कार्यकारी अभियंत्याला नेर-दारव्हामध्ये शिवसेनेच्या विरोधात व आपल्या सोईने वापरायचे असा हा काँग्रेसच्या मुळ तेथील बड्या नेत्याचा छुपा अजेंडा आहे. काँग्रेसच्या या खेळीपासून शिवसेना अनभिज्ञ आहे. (जिल्हा प्रतिनिधी)