जिल्ह्यातील सातही मतदार संघात काँग्रेसला नाकारले
By Admin | Updated: October 19, 2014 23:18 IST2014-10-19T23:18:20+5:302014-10-19T23:18:20+5:30
पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले.

जिल्ह्यातील सातही मतदार संघात काँग्रेसला नाकारले
यवतमाळ : पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले.
राळेगाव, उमरखेड, आर्णी या मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. तर वणी, दिग्रसमध्ये तिसऱ्या, यवतमाळ व पुसदमध्ये चौथ्या स्थानावर काँग्रेस उमेदवार फेकले गेले. सातपैकी तीन उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही. त्यामध्ये खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुलाचाही समावेश आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पाचही जागा यावेळी मतदारांनी त्यांच्याकडून काढून घेऊन भाजपाच्या हाती दिल्या आहेत. यावरून काँग्रेस प्रती मतदारांमध्ये असलेली चिड स्पष्ट होते. अशीच अवस्था जिल्ह्यात पक्ष संघटनेची झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असूनही येथे पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नाही. या कार्यकारिणीशिवाय पक्ष निवडणुकीला सामोरे गेला. जिल्हा काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. प्रदेशाध्यक्ष विरुद्ध इतर असे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंत्री-आमदारांना शह देण्यासाठी त्यांच्या बंडखोरांना आश्रय देणे प्रदेशाध्यक्षांना चांगलेच भोवले. पक्ष संघटन खिळखिळे झाले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जिल्ह्यात पाच वर्षे पाच आमदार आणि प्रदेशाध्यक्षपद असूनही जिल्ह्याच्या पदरी काहीच पडले नाही. साडेपाच वर्ष टाईमपास केल्यानंतर अखेरच्या सहा महिन्यात काँग्रेसच्या आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावून केवळ विकास कामांचा देखावा निर्माण केला. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसला जिल्ह्यात सपशेल नाकारले.
पाचवरून शून्यावर
सन २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यातील वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड या सात पैकी पाच जागा आपल्याकडे खेचून आणल्या होत्या. त्यावेळी या सर्व जागांचे श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वत:कडे घेतले होते. मात्र आता त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेस या पाच जागांवरून शुन्यावर आली आहे.