शासकीय कार्यालयांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:33 IST2018-04-28T23:33:58+5:302018-04-28T23:33:58+5:30
पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये ठणठणाट
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.
यवतमाळ बसस्थानकावर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी पाय ठेवताच प्रवासी पाणी शोधतात. बसस्थानकाच्या मोठ्या पाणपोईवर धडकतात. या पाणपोईला नऊ नळाच्या तोट्या बसविल्या आहेत. सहा तोट्या बंद आहेत. इतर तोट्यांतील पाणी गरम असते. यवतमाळ अर्बन बँकेची खासगी पाणपोई आहे. या ठिकाणी बॅरलची व्यवस्था आहे. परंतु हे बॅरल दुपारपर्यंत येतच नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात मोजकेच पाणी ठेवण्यात येते. नागरिकांच्या वर्दळीने हे पाणी कधी संपेल याचा नेमच नसतो. बचत भवनालगतच्या पाणपोईत पाणीच नसते. तेथून नागरिकांना नेहमीच रिकाम्या हाताने परतावे लागते. ज्या कार्यालयात काम आहे, त्या ठिकाणी पाणी कुठे मिळेल, अशी विचारणा करावी लागते. अनेकवेळा तर जिल्हाधिकाºयांच्या कक्षाबाहेरील पाणपोईच्या राजणातही पाणी नसते. अशावेळी नागरिकांना जिल्हा कचेरी बाहेरील दुकानातच पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. या ठिकाणच्या काही कक्षात तर पाणी पडद्याआड जपून ठेवल्या जाते. तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाची स्थिती अशीच आहे. तहसील कार्यालयातील पाणपोईत पाणीच नाही. तहसीलमध्ये अलीकडे खासगी वॉटर फिल्टर उभारले आहे. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी हापशीचा वापर होत होता. आता हापशीच आटली आहे. यामुळे वॉटर फिल्टर टँकमध्ये पाणी नाही. या ठिकाणी विहीर आहे. ती कचºयाने भरली आहे. यामुळे तहसील कार्यालयात येणाºया नागरिकांना पाण्यासाठी शेजारच्या हॉटेलवरच धाव घ्यावी लागते. आरटीओ कार्यालयातील फ्रिजर बंद अवस्थेत पडला आहे. येथील गंजलेला फ्रिजर पाहून पाण्याची काय स्थिती असेल, याचा अंदाज येतो. कोषागार कार्यालयात फ्रिजर लावला आहे. मात्र त्या ठिकाणी पिण्याचे पाणी नसते. ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नवीन इमारतीमधील या कार्यालयात पाण्याची व्यवस्था नाही.
अपंगांच्या प्रसाधनगृहाला कुलूप
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात नागरिकांची सर्वाधिक वर्दळ आहे. या ठिकाणी येणाºया अपंग नागरिकांना कुलूपबंद प्रसाधनगृहाने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. उपविभागीय कार्यालयात तर अपंगांना वर चढण्यासाठी सोयच नाही. यामुळे या ठिकाणी अपंगांना उपविभागीय अधिकाºयाकडे हजर करताना प्रचंड सर्कस करावी लागते.
कोंडवाड्यात पाणीच नाही
शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकरिता कोंडवाडा उभारण्यात आला आहे. तहसील कार्यालयाजवळ असलेला हा कोंडवाडा जनावरांसाठी शिक्षागृह झाला आहे. या ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. चाराही उपलब्ध नाही. यामुळे या कोंडवाड्याकडे जनावर घेऊन जाण्याचे टाळलेच जात आहे.
आधी नाश्ता, नंतर पाणी
नागरिक हॉटेलमध्ये पाण्यासाठी गेले तर हॉटेल मालक सहसा पाणी देत नाही. या ठिकाणी प्रथम नाश्ता करा, अथवा चहा तरी घ्या. यानंतरच पिण्याचे पाणी दिले जाईल, असे बजावले जात आहे.