जिल्ह्यात कलेक्टर, सीईओ, एसपी सारेच महाराष्ट्रीयन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST2021-03-28T05:00:00+5:302021-03-28T05:00:11+5:30

आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.

Collector, CEO, SP all Maharashtrians in the district | जिल्ह्यात कलेक्टर, सीईओ, एसपी सारेच महाराष्ट्रीयन

जिल्ह्यात कलेक्टर, सीईओ, एसपी सारेच महाराष्ट्रीयन

ठळक मुद्देप्रशासनात मराठी टक्का वाढला : जिल्ह्याच्या ‘वऱ्हाडी’शी समरस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘प्युअर’ मराठी बोलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन अनेकदा हिंदी व अन्य भाषिक अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले गेले. ते अधिकारी चांगले असले तरी त्यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचणाऱ्या खेड्यापाड्यातील जिल्हावासीयांना अनेकदा अडचणी येत होत्या; पण आता अनेक वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला संपूर्ण मराठी अधिकारी लाभले आहेत. जिल्हा प्रशासनातील हा वाढलेला मराठीचा टक्का जिल्ह्याच्या विकासाला खास ‘मराठी’ स्पर्श देणार का, अशी आशा सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे.
आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.
नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे आले आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण बालपण महाराष्ट्रात घालविलेले येडगे यांनी पूर्वी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम केले. त्यामुळे वऱ्हाड कसा आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. तर गेल्या वर्षीच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पदभार स्वीकारला. तेही मूळचे महाराष्ट्रीय (लातूर) असून मराठी जनमानस त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तर काही महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डाॅ. दिलीप पाटील भुजबळ बुलडाण्यातून यवतमाळात आले. ते मूळचे जुन्नर (पुणे) येथील आहेत.  हे तिन्ही आयएएस, आयपीएस अधिकारी जिल्हा प्रशासनाची धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्राच्या मराठीसोबत त्यांचे जन्मजात नाते आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांना अडचण येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य माणसे प्रमाण मराठीपेक्षाही अधिक ठसकेदार वऱ्हाडी बोलतात. त्या ‘प्युअर’ भाषेचीही आता या अधिकाऱ्यांनी ओळख करून घेतली आहे. मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हावासीयांनाही त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी घेऊन जाताना ‘आपलेपणा’ जाणवतो, तो त्यांच्या भाषेमुळेच; पण जिल्ह्यातील प्रश्न ताकदीने सोडवायचे असतील, तर भाषेसोबत स्थानिक जनजीवनही जाणून घेणे आवश्यक आहे.

तब्बल दहा वर्षानंतर लाभले ‘आपलेपण’ 
 जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे तिन्ही जिल्हा प्रशासनाचे आधारस्तंभ अस्सल मराठी आहेत. दहा वर्षापूर्वी असा योग डाॅ. हर्षदीप कांबळे, डाॅ. श्रीकर परदेशी आणि हिंमतराव देशभ्रतार यांच्या निमित्ताने साधला गेला. त्यानंतर आता हा ‘आपलेपणा’ पुन्हा परतला आहे. 

 

Web Title: Collector, CEO, SP all Maharashtrians in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी