शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झुंबड
By Admin | Updated: December 27, 2014 02:45 IST2014-12-27T02:45:25+5:302014-12-27T02:45:25+5:30
येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झंबड उडत आहे.

शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झुंबड
मारेगाव : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झंबड उडत आहे.
या विभागात काम करणारा कारकून कामाच्या व्यापाने अचानक आजारी पडला आहे. त्यामुळे एक महिन्यापासून शिधापत्रिकांची कामे रेंगाळली होती. आता त्यांच्या जागी नवा कर्मचारी कामाला लागल्याने शिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधित कारकुनाच्या टेबलभोवती नागरिकांची झुंबड दिसू लागली आहे.
तालुक्यात शिधापत्रिकांतून नावे कमी करणे, नवीन नावे दाखल करणे, दुय्यम शिधापत्रिका तसेच नवीन शिधापत्रिकांसाठी अनेकांनी अर्ज केले आहे. काही नागरिक आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या मदतीने कामे करून घेत आहेत. काहींना त्याच कामासाठी सातत्याने चकरा माराव्या लागत आहे. काहींचे अर्जच गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत. येथे नव्यानेच रूजू झालेल्या कारकुनाचा बाहेरील सहकारी तर नागरिकांना शिधापत्रिकेच्या अर्जासाठी १० रूपये मागत असून त्वरित काम करण्यासाठी बक्षीसे मागत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी होणारी गैरसोय व संबंधित बाबूसोबत होणारी ‘तू-तू, मै-मै’ टाळण्यासाठी तहसीलदारांनी मंडळनिहाय शिधापत्रिकांची शिबिरे आयोजित करावी, अशी जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)