आंब्यांचा ‘केमिकल’ लोचा
By Admin | Updated: April 18, 2017 00:13 IST2017-04-18T00:13:29+5:302017-04-18T00:13:29+5:30
सध्या उन्हाळा सुरू असून आंब्याचा मोसम बहरला आहे.

आंब्यांचा ‘केमिकल’ लोचा
कार्बाईडचा वापर : वणीकर जनतेचे आरोग्य धोक्यात
वणी : सध्या उन्हाळा सुरू असून आंब्याचा मोसम बहरला आहे. आंब्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन वणीतील काही आंब्याच्या ठोक विक्रेत्यांनी कार्बाईड या केमिकलचा वापर करून आंबे पिकविण्याचा गोरखधंदा सुरू केला असल्याची माहिती आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तेंदू पान, पळसाची पाने अथवा तणसाचा वापर करून आंबे पिकविण्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु अलिकडे या पद्धतीला फाटा देऊन ग्राहकांची गरज हेरत आंब्याच्या रूपाने त्यांच्या हाती विष देण्याचा धंदाच तेजित आला आहे. गेल्या काही वर्षापासून आंबे पिकविण्यासाठी कार्बाईड नामक रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वणीत हा गोरखधंदा सध्या तेजित आहे. कार्बाईडमुळे अवघ्या काही तासात हिरवे आंबे पिकविले जातात. त्यानंतर ते बाजारात आणून त्याची ग्राहकांना विक्री केली जात आहे.
सध्या वणीच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या जातीचे आंबे विक्रीसाठी आले आहे. हे आंबे वरून दिसायला अतिशय आकर्षक असले तरी ते पारंपरिक पद्धतीनेच पिकविले असल्याची कोणतीही शक्यता नसते. अनेकदा ग्राहक याची खातरजमा न करता आंब्याची खरेदी करीत आहे.
कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी अनेकजण या व्यवसायात उतरले आहे. कार्बाईड हे रसायन आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. कार्बाईडपासून पिकविलेल्या आंब्याच्या अति सेवनाने पोटाचे विकार बळावतात. यामुळे कर्करोगासारखाही आजार बळावण्याची शक्यता असते. असे असतानाही आंबा विक्रेते सर्रास कार्बाईडद्वारे आंबे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे. येत्या २८ एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण साजरा केला जाणार आहे. यासाठी आंब्याची मागणीही वाढणार आहे. ही मागणी लक्षात घेऊन कार्बाईडद्वारे आंबे पिकविण्याचा धंदा पुन्हा तेजित येण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी मेहेरबान
एकीकडे कार्बाईडद्वारे आंब्यासह विविध फळे पिकविण्याचा धंदा वणीत तेजित असताना अन्न व औषध प्रशासनाने मात्र आपल्या डोळ्यावर पट्ट्या चढविल्या आहे. या विभागाचे अधिकारी वणीत कधी येतात व कधी जातात, हे कुणालाही कळत नाही. त्यामुळे फळ विक्रेत्यांचे फावत आहे.