लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव (यवतमाळ) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर वाहतुकीला अडथळा निर्माण करून तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा शेतकऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. महागाव पोलिसांनी सोमवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सातबारा कोरा या पदयात्रेचा सोमवार १४ जुलै रोजी तालुक्यातील आंबोडा येथे समारोप झाला. श्री गजानन महाराज मंदिर ग्राम आंबोडा या ठिकाणी सातबारा कोरा यात्रेची समारोपीय सभा नियोजित होती.
पदयात्रा आंबोडा गावात नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर दुपारी दाखल झाली. राष्ट्रीय महामार्ग खडका ते आंबोडापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव चालत होता. त्यामुळे वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरील विस्कळीत झाली. पदयात्रेमध्ये ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ५ ते ७ हजार जनसमुदाय उपस्थित होता. समारोपीय सभा आयोजकांनी कुठलीही परवानगी न घेता श्री गजानन महाराज मंदिर परिसराऐवजी ऐनवेळी आंबोडा उड्डाण पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आयोजित केली. तसेच ३० ते ४० ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली.
पर्यायाने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे सांगत, पोलिस उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायंदे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह गणेश दादाराव ठाकरे, आकाश भाऊराव पावडे, रामेश्वर विठ्ठल कदम, सचिन प्रकाश राऊत, बंडू लहुजी वाघमारे, सुनील देविदास पावडे, सदानंद राऊत, पप्पू विश्वनाथ करपे, शेख रियाज, योगेश तायडे, शुभम हेडे (सर्व रा. आंबोडा, ता. महागाव) यांच्याविरुद्ध कलम १२६ (२), १८९ (२), २२३ बीएनएस सहकलम १३५ मपोका कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.