कोळसा हेराफेरीप्रकरणी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल; कोळशाच्या धंद्यात कुणाचे हात काळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:23 IST2026-02-27T12:21:31+5:302026-02-27T12:23:14+5:30
Yavatmal : उकणी कोळसा खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा रेल्वे साइडिंगवर न नेता या कोळशाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्या जागी माती व गिट्टी भरून ते साइडिंगवर आणण्यात आले.

Case registered after three days in coal smuggling case; Whose hands are black in the coal business?
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी (यवतमाळ) : उकणी कोळसा खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा रेल्वे साइडिंगवर न नेता या कोळशाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्या जागी माती व गिट्टी भरून ते साइडिंगवर आणण्यात आले. या गंभीरप्रकरणी वणी पोलिसांनी अखेर तीन दिवसांनंतर केवळ दोन ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोळशाच्या या काळ्या धंद्यात कुणा-कुणाचे हात काळे झाले आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या हेराफेरीत अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा कोळसा हेराफेरीचा प्रकार घडला. तो उजेडात आल्यानंतर याप्रकरणी कोलारपिपरी सबएरियाचे उपक्षेत्रीय प्रबंधक युसूफ एम. हुसेन यांच्यातर्फे रेल्वे साइडिंग इन्जार्ज देवेंद्र प्रतापसिंग परिहार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी ट्रकचालक सैफ अली व विश्वनाथ या दोघांविरुद्ध बीएनएसच्या ३१६ (३), ३१८ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही आरोपी ट्रक चालक फरार आहेत. तक्रारीनुसार २२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत मे. कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या खासगी कंपनीचे दोन ट्रक (क्र. सीजी ११ बीएम ९०३३, सीजी १५ ईएच ३२७४) पोहोचले. या कंपनीला कंत्राट दिले आहे. हा कोळसा वीज वितरण कंपनीला पाठविला जातो. त्यानुसार या दोन्ही ट्रकमध्ये कोळसा भरून सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वणी रेल्वे साइडिंगकडे निघाले. ८ वाजता हे ट्रक रेल्वे साइडिंगजवळील टोल नाक्यावर पोहोचले. टोल नाक्यावरून साइडिंगचे अंतर केवळ ५ मिनिटांचे आहे.
मात्र, हे ट्रक रात्री ९:३० वाजता साइडिंगवरील काट्यावर पोहोचले. काटा झाल्यानंतर ट्रकमधील कोळसा रिकामा करताना त्यामध्ये माती व गिट्टी भरून असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. येथूनच या हेराफेरीचे बिंग फुटले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोळशाची तांत्रिक तपासणी केल्यानंतर वणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
कोळशाची खेप नेमकी उतरली कुठे ?
- टोल नाक्यावरून निघालेले हे ट्रक लालपुलिया परिसरातील एका धरमकाट्याच्या मागे असलेल्या प्लॉटवर पोहोचले.
- तेथे ट्रकमधील उच्च प्रतीचा कोळसा उतरविण्यात आला व कळमना मार्गावरील एका कोळसा प्लॉटवरून माती व गिट्टीमिश्रित निकृष्ट दर्जाचा कोळसा ट्रकमध्ये भरून तो साइडिंगवर आणण्यात आला, अशी चर्चा कोळसा व्यावसायिकांमध्ये आहे.
- यात काही राजकीय व्यक्ती गुंतले असल्याचेही बोलले जात आहे. या गोरखधंद्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे उभे आहे.