श्रीमंतांच्या उपचारासाठी ९५ लाखांची यंत्र खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:20 IST2019-07-04T21:19:27+5:302019-07-04T21:20:20+5:30
जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे असे एसएसयू नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या गंभीर रुग्णांना काही तास निगराणीत ठेवणे शक्य होत नाही. दोन ते तीन बेड असल्याने डॉक्टरांची अडचण होते.

श्रीमंतांच्या उपचारासाठी ९५ लाखांची यंत्र खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे असे एसएसयू नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या गंभीर रुग्णांना काही तास निगराणीत ठेवणे शक्य होत नाही. दोन ते तीन बेड असल्याने डॉक्टरांची अडचण होते.
रुग्णालय प्रशासनाने जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्याकडून चालू आर्थिक वर्षात नवीन यंत्रसामुग्री खरेदीचा प्रस्ताव तयार केला. एक कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांच्या यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये आठ अडॉल्ट व्हेंटिलेटर ज्याची किंमत ९२ लाख ८० हजार इतकी आहे. हे व्हेंटिलेटर विषबाधा झालेल्या रुग्णांसाठी गरजेचे आहे. येथे विषबाधेच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे. मात्र बॅरिअॅट्रिक (लठ्ठपणाच्या) सर्जरीसाठी लॅप्रोस्कोप विथ आॅल अॅसेसरिज ६० लाख रुपये आणि बॅरिअॅट्रिक आॅपरेशन टेबल ३५ लाख रुपये हे साहित्य खरेदी केले जाणार आहे. प्रत्यक्ष यापेक्षा अत्यावश्यक असे जनरल सर्जरीसाठी लॅप्रोस्कोप खरेदी करणे गरजेचे आहे. सध्या एकच लॅप्रोस्कोप असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. लॅप्रोस्कोपच्या माध्यमातून विनाटाका-विनाचिरा शस्त्रक्रिया करता येते. रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे या प्रस्तावात लॅप्रोस्कोप खरेदीचा प्राधान्याने समावेश करणे अपेक्षित होते. शिवाय शस्त्रक्रियागृहात एसएसयू (शार्ट स्टे यूनिट) अद्यावत असणे आवश्यक आहे. येथील कॉटची क्षमता वाढविण्याची गरज आहे. केवळ दोन ते तीन कॉट एका कोंदट रूममध्ये टाकून एसएसयू चालविले जात आहे. येथेच रुग्णांना संसर्ग होण्याची भीती आहे.
गरीब रुग्णांच्या हिताचा विचारच नाही
पूर्णत: संसर्गमुक्त व सुविधेने सुसज्ज असा एसएसयू प्राधान्याने तयार करणे गरजेचे आहे. खनिज विकास निधीतून यासाठी निधी न मागता लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्री अंतर्भूत केली आहे. एकंदर गरीब रुग्णाच्या हिताचे निर्णय होताना दिसत नाही. या खरेदी प्रस्तावाला जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गरज लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन अपेक्षित आहे. लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया सामुग्रीऐवजी अत्यावश्यक असा एसएसयू तयार करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.