देशी कट्टा विकताना दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:09 IST2017-11-14T23:09:13+5:302017-11-14T23:09:36+5:30
शहरात सध्या टोळीयुद्ध धुमसत असून टोळी सदस्यांकडून अग्नीशस्त्रांची खरेदी केली जात आहे.

देशी कट्टा विकताना दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात सध्या टोळीयुद्ध धुमसत असून टोळी सदस्यांकडून अग्नीशस्त्रांची खरेदी केली जात आहे. परिणामी घातक शस्त्रांचे व्यापारी यवतमाळात ग्राहक शोधण्यासाठी येतात. यातूनच सोमवारी दुपारी बुलडाणा येथून दोन देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना टोळीविरोधी पथकाने लोहारा एमआयडीसी परिसरात अटक केली.
गजानन भिकाजी ठाकरे (४०), रवींद्र गणेश उमाळे दोघेही रा. टुणकी ता. संग्रामपूर जी. बुलडाणा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. हे दोघे लाल रंगाच्या दुचाकीने येथे देशी पिस्टल व काडतूस विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती अॅन्टी गँगसेलचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. त्यावरून टोळीविरोधी पथकाने एमाआयडीसी परिसरात सापळा रचला. पोलिसांनी दारव्हामार्गे येत असलेल्या या दोन आरोपींची पंचासमक्ष अंग झडती घेतली. त्यात गजानन ठाकरे याच्या कमेरला दोन्ही पिस्टल खोचलेले आढळून आले.
हे दोन्ही पिस्टल यवतमाळात विकण्यासाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. या पिस्टलची किंमत एक लाख ६२ हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पीआय संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, किरण पडघण, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, सूरज गजभिये, जयंत शेंडे, राजकुमार कांबळे, श्रीधर शिंदे, आकाश मसनकर, सतीश सिडाम, शशिकांत चांदेकर, शंकर भोयर, राहुल जुंकटवार, गौरव ठाकरे यांनी केली.