महिलेचा खून करून मृतदेह गोठ्यात लपविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:37 IST2019-07-09T19:37:51+5:302019-07-09T19:37:57+5:30
क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा काठीने मारहाण करीत खून करण्यात आला.

महिलेचा खून करून मृतदेह गोठ्यात लपविला
पांढरकवडा (यवतमाळ) : क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा काठीने मारहाण करीत खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने सदर महिलेचा मृतदेह गोठ्यात नेऊन कुटारात (जनावराचा चारा) लपवून ठेवण्यात आला. एवढेच नव्हे तर ही महिला बेपत्ता असल्याचा देखावाही निर्माण केला गेला. पांढरकवडा तालुक्यातील सखी या गावात सोमवारी रात्री ही घटना घडली.
आशा चंपत मेश्राम (३०) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात अर्जुन जयवंत मेश्राम (३५) याला अटक केली आहे. आशा व अर्जुन गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहात होते. मात्र अर्जुनला दारूचे व्यसन लागल्याने त्यातूनच तो तिला मारहाण करायचा. सोमवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला व त्याचे पर्यावसन आशाच्या खुनात झाले. अर्जुनने यावेळी शेजारी व गावक-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.