भाजपाला सर्वाधिक पाच जागा

By Admin | Updated: October 19, 2014 23:18 IST2014-10-19T23:18:00+5:302014-10-19T23:18:00+5:30

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही

The BJP has five seats | भाजपाला सर्वाधिक पाच जागा

भाजपाला सर्वाधिक पाच जागा

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही.
गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार होते. मात्र यावेळी या पाचही जागा भाजपाने पटकाविल्या. त्यामुळे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे या दिग्गजांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्र राहुल ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुसदमध्ये मनोहरराव नाईकांच्या रुपाने राष्ट्रवादीने तर दिग्रसमध्ये संजय राठोड यांच्या रुपाने शिवसेनेने आपली जागा कायम राखली. संजय राठोड यांनी विजयाची हॅटट्रिक साधताना ७९ हजार ८६४ एवढ्या विक्रमी मतांनी निवडून येण्याचा पराक्रम केला. मतांची ही आघाडी विदर्भात सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक यांनीही तब्बल ६५ हजार ३५९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव केला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळाली. अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्यात पाठलाग सुरू होता. अखेर भाजपाचे मदन येरावार यांनी अवघ्या एक हजार २२७ मतांनी निसटता विजय मिळविला. शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी तब्बल ५२ हजार ४४४ मते घेत भाजपाला अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. त्यांच्या थोड्या फरकाने झालेल्या पराभवाने यवतमाळ शहरासह मतदारसंघात सर्वत्र हळहळ पहायला मिळाली. बसपाच्या मो.तारीक मो.शमी यांनी ३४ हजार ४९८ मते घेऊन तिसरा क्रमांक गाठला. काँग्रेसचे राहुल ठाकरे (३२१५२) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया (१७९०९) यांना आपले डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील मतांच्या बळावर आमदारकीचे स्वप्न रंगविणाऱ्या रवींद्र देशमुख यांच्याही भ्रमाचा फुगा फुटला. त्यांना केवळ ११८९ मते मिळाली.
मंत्री पदासाठी चढाओढ
राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ते पाहता मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपातून मदन येरावार तर शिवसेनेतून संजय राठोड प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कारण भाजपाचे अन्य चार विजयी उमेदवार विधानसभेसाठी नवखे ठरत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये जिल्ह्याला दोन मंत्री पदे आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या निमित्ताने तिसरा लाल दिवा मिळाला होता. यावेळी किती लालदिवे मिळतात याकडे नजरा लागल्या आहेत.

Web Title: The BJP has five seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.