BJP claims sixth constituency | भाजपचा सहाव्या मतदारसंघावर दावा

भाजपचा सहाव्या मतदारसंघावर दावा

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : शिवसेनेकडे केवळ दिग्रस, उमरखेडमध्ये उमेदवार रिपाइंचा, चिन्ह भाजपचे


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संख्याबळाने भाजपपेक्षा सरस असल्याने शिवसेनेला विधानसभेच्या अर्ध्या जागांची मागणी होत असतानाच भाजप जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघ स्वत: लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसे झाल्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.
जिल्ह्यात सध्या सात पैकी पाच जागा भाजपकडे तर शिवसेना व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते. अनेक ठिकाणी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आहेत, जिल्हा परिषदेमध्ये २० सदस्य आहेत, अनेक नगरपरिषदा, पंचायती, सहकारी संस्था शिवसेनेच्या आहेत. भाजप एवढीच आमची ताकद आहे, असे सांगत शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिग्रस, पुसदशिवाय वणी व उमरखेड या नव्या मतदारसंघांवर जोरदार दावा सांगितला होता. एवढेच नव्हे तर यवतमाळची जागाही मागण्यात आली होती. शिवसेनेचा जोर पाहता किमान वणी, उमरखेड हे अतिरिक्त दोन मतदारसंघ शिवसेनेला सुटतील असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात भाजप जिल्ह्यामध्ये सेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे.
सूत्रानुसार, जिल्ह्यातील सात पैकी सहा जागा भाजप स्वत: लढणार आहे. युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या पुसदच्या जागेवरही आता भाजपने दावा सांगितला आहे. अर्थात जुन्या पाच जागा ‘सिटींग-गेटींग’ या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे कायम असून पुसदची अतिरिक्त जागाही भाजपने जवळजवळ मिळविल्याचे सांगितले जाते. ते पाहता जिल्ह्यात खासदार, राज्यमंत्री, तीन जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० सदस्य असताना शिवसेनेला केवळ आपल्या दिग्रस या एकाच जागेवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. पुसद भाजपला देऊन उमरखेड शिवसेनेसाठी मागितला जात असला तरी प्रत्यक्षात ही जागा रिपाइंच्या आठवले गटाने मागितली आहे. विदर्भातील एकमेव जागा मागितल्याने ही जागा रिपाइंला सोडण्याचेही निश्चित झाले आहे. केवळ ‘उमेदवार रिपाइंचा आणि चिन्ह भाजप’चे या प्रयोगावर बोलणी सुरू आहे. आतापर्यंत उमेदवार रिपाइंचा तर चिन्हही रिपाइंचेच अशी ताठर भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप श्रेष्ठींपुढे घेतली होती. रिपाइंची ओळखच संपून जाईल, असा आठवलेंचा या मागील युक्तीवाद होता.
मात्र भाजप नमते घेत नसल्याचे पाहून अखेर आठवलेंनी आपला उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढविण्याची तत्वत: तयारी दर्शविल्याचे रिपाइंच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उमरखेडची जागा रिपाइंला सुटल्यास शिवसेनेकडे पर्याय म्हणून ही जागा घेण्याचीही सोय राहणार नाही. अशावेळी दिग्रसच्या एकाच जागेवर सेनेला समाधान मानावे लागणार आहे.

Web Title: BJP claims sixth constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.