उभ्या एसटीवर दुचाकी धडकली, महिलेचा मृत्यू, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:27 IST2023-11-27T13:26:11+5:302023-11-27T13:27:23+5:30
आठमूर्डी फाट्यावरील घटना : जखमीमध्ये महिला, युवकाचा समावेश

उभ्या एसटीवर दुचाकी धडकली, महिलेचा मृत्यू, दोन जखमी
वडकी (यवतमाळ) : प्रवासी उतरविण्यासाठी थांबलेल्या एसटी बसवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राळेगाव-वडकी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१-बी वरील आठमूर्डी (ता.राळेगाव) फाट्यावर घडली. कमलाबाई मारोती पोहणकर (६५) रा.वाढोणा बाजार, असे मृत महिलेचे नाव आहे.
वणी आगाराची एमएच ०६ - एस ८८२५ क्रमांकाची बस राळेगाव येथून वडकीकडे येत होती. वाढोणा बाजार जवळच्या आठमूर्डी फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी ही बस थांबली. दरम्यान, वाढोणा बाजारकडून येणारी दुचाकी (एमएच २९ - एचएच ८९६६) या बसवर धडकली. यात दुचाकीवरील कमलाबाई मारोती पोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला. कलावती सोनवने (४५) आणि दुचाकी चालक सुजल सोनवने हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून नागरिकांनी वडकी पोलिसांशी संपर्क केला. ठाणेदार विजय महाले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघातग्रस्त बस व दुचाकी वडकी पोलिसांनी ताब्यात घेतली होती.