पुसद शहरातील बरखा टॉकीजला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:23 IST2018-11-09T22:23:27+5:302018-11-09T22:23:58+5:30
येथील बरखा टॉकीजला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. सिनेमागृहाच्या आत बसून मनोरंजक चित्रपट पाहणाऱ्या पुसदकरांना संपूर्ण जळते सिनेमागृह पाहणारे प्रेक्षक बनावे लागले.

पुसद शहरातील बरखा टॉकीजला भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील बरखा टॉकीजला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. सिनेमागृहाच्या आत बसून मनोरंजक चित्रपट पाहणाऱ्या पुसदकरांना संपूर्ण जळते सिनेमागृह पाहणारे प्रेक्षक बनावे लागले.
शहराच्या मध्यभागी बरखा टॉकीज आहे. गुरूवारी रात्री शेवटचा ९ ते १२ चा शो संपल्यानंतर प्रेक्षक घरी परतले होते. काही वेळाने टॉकीजमधून धूर येताना दिसला. चौकीदाराने याबाबत मालक कबीरोद्दीन गाझीयानी यांना माहिती दिली. ही वार्ता शहरातही पसरली. लगेच पुसद, उमरखेड व दिग्रस येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ४ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीत संपूर्ण टॉकीज खाक झाली. यात सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लुले यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली व गर्दीला नियंत्रित केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा कयास वर्तविला जात आहे. टॉकीज मालक कबीरोद्दीन गाझीयानी, मॅनेजर बदरुद्दीन गाझीयानी यांनी शहर पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे.