लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला विविध समस्यांनी ग्रासले असून सर्वसामान्य खातेधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील शाखेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे खातेधारकांची कामे रेंगाळत चालली आहे. चेक जमा होण्यासाठी आठ-आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील शाखेत कोणतीच कामे वेळेत पूर्ण होत नाही. कर्मचारी कामाचा ताण असल्याचा दिखावा करून कामे करण्यासा टाळाटाळ करताना दिसून येतात. येथील शाखा किरायाच्या इमारतीत असून अनेकवेळा ग्राहकांची गर्दी झाल्यास बँकेला कोंडवाड्याचे स्वरूप येते. अनेकवेळा गर्दी पाहूनच बँकेत शिरण्याचे टाळतात. शाखेत पार्किंगची मोठी समस्या असून मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येतात. याचा परिणाम मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर होत आहे. वाहने विस्कळीत असल्याचे लक्षात येताच पोलीस पथक हजर होते व ग्राहकांना विनाकारण त्रास दिला जातो. ग्राहकांना चोप देणे, वाहनातील हवा सोडणे, प्रसंगी ग्राहकास मारहाण करणे, असेही प्रकार हल्ली वाढले आहे. येथील शाखेत व्यवस्थापक कनाके यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर तब्बल सहा महिने शाखेचा कारभार प्रभारावरच सुरू होता. त्यामुळे येथील कारभार ढेपाळला होता. आता येथील शाखेत सदोबा सावळी शाखेतून नवीन व्यवस्थापक म्हणून नुकतेच ए.एच.नागदिवे रूजू झाले आहेत. त्यांच्यासमोर येथील शाखेतील अनेकविध समस्यांचा डोंगर उभा आहे. विविध समस्यांचे निराकरण करून येथील खातेधारकांना योग्य सेवा देण्यात त्यांना कितपत यश येणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. पार्किंगची समस्या ही सर्वच बँकासाठी मोठी समस्या बनली असून यामुळे रस्त्यावरच वाहने उभी करण्याशिवाय ग्राहकांना पर्याय नाही. त्यामुळे सर्वच बँकांनी पार्किंगच्या सुविधेची उपलब्धता करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्र बँकेच्या कारभाराला पांढरकवडावासी वैतागले
By admin | Updated: June 7, 2017 01:04 IST