संतोष सोन्स यांचे मार्गदर्शन : राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ कार्यशाळायवतमाळ : बाल रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटना कार्यरत आहे. जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची ही संघटना असून आता अॅन्टीबायोटिकांचा (प्रतिजैविके) संतुलित वापर कसा करायचा, यासाठी कार्यशाळा घेऊन जागृती कार्यक्रम राबवित असल्याचे बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष सोन्स यांनी पत्रपरिषदेत सांगितले. बालरोग तज्ज्ञ संघटनेकडून देशात रॅशन्ल अॅन्टीबायोटिक प्रोग्राम (रॅप) राबविला जात आहे. यामध्ये बालरोग तज्ज्ञ आणि जनरल फिजीशन यांनी अॅन्टीबायोटिकचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले जाते. शिवाय पालकांमध्येही जाणीवजागृती केली जाते. अनेकदा पालकांकडूनच अॅन्टीबायोटिकची मागणी डॉक्टरांना केली जाते. अनेकदा फार्मासिस्ट अथवा वैद्यकीय क्षेत्राबाहेरील व्यक्तीकडून अॅन्टीबायोटिकचे डोज दिले जातात. याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. ‘रॅप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती केल्याने जवळपास ३० टक्के अॅन्टीबायोटिकची विक्री घटल्याचेही डॉ.सोन्स यांनी सांगितले.राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटनाही केंद्र व राज्य शासनाचे आरोग्य विषयक धोरण ठरविण्यासाठी मदत करते. मूल व माता यांच्यासाठी राबविणाऱ्यात येणाऱ्या लसीकरण व पोषण आहाराच्या योजनांचा दर्जा बालरोग तज्ज्ञ संघटनेकडूनच निश्चित केला जातो. खास करून लसीकरणात वापरली जाणारी लस, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक कार्यक्रम राबविला जातो. संघटनेने सध्या कर्नाटक, तामिळनाडू, पॉन्डेचरी, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ या राज्यांमध्ये लसीकरणाबाबत जागृती कार्यक्रम राबविले. बालरोग तज्ज्ञांसाठी (होप) हॅन्डलिंग आॅफ पिडीयाट्रीक इमर्जन्सीज यावर यवतमाळातील कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग व येथील बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. अकस्मात स्थितीत आलेल्या बालरुग्णांवर उपलब्ध साधनांचा वापरुन करून कसा उपचार करावा, त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कसे पाठवावे, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. २ ते ७ जानेवारी २०१८ या कालावधीत नागपुरात बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद आयोजित असल्याचे बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.वसंत खलतकर यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जोशी उपस्थित होते. कार्यशाळेला यवतमाळसह जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (कार्यालय प्रतिनिधी)
अॅन्टिबॉयोटिकच्या संतुलित वापरासाठी जागृती
By admin | Updated: April 10, 2017 01:50 IST