कालव्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: December 30, 2016 00:16 IST2016-12-30T00:16:50+5:302016-12-30T00:16:50+5:30
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील चालगणी ते बोरी वितरिकेचे काम पूर्ण होऊनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.

कालव्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ
एसडीओंना दिले निवेदन : शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
उमरखेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील चालगणी ते बोरी वितरिकेचे काम पूर्ण होऊनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रबी हंगाम धोक्यात आला असून, तत्काळ पाणी न सोडल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
डाव्या कालव्यावरील चालगणी ते बोरी वितरिकेचे काम १० वर्षांपासून सुरू आहे. सदर काम आता पूर्ण झाले आहे. परंतु उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे नांदेड येथील अधिकारी जाणीवपूर्वक पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे कोपरा, बोरी, चातारी, माणकेश्वर आदी गावातील रबी हंगाम धोक्यात आला आहे. संबंधितांनी ४ जानेवारीपर्यंत वितरिकेत पाणी न सोडल्यास ५ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर कृष्णा पाटील देवसरकर, कोपराचे सरपंच धनंजय माने, चातारीचे सरपंच भगवान माने, बोरीचे सरपंच तुकाराम माने, माणकेश्वर येथील बाळू पाटील, वसंतचे संचालक कल्याणराव माने, नानाराव चव्हाण, विनायक कदम, शेख रियाज, अरविंद धबडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)