बोटोणी : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे़ याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे़आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या उद्देशाने सन १९७२ पासून आदिवासी विकास विभागांतर्गत पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येथे आश्रमशाळा चालविण्यात येते़ ही शाळा वणी, यवतमाळ या राज्य मार्गाला रस्त्याद्वारे जोडलेली आहे. या आश्रमशाळेला लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यासाठी गावाबाहेरून व बेघर वस्तीलगत डांबरीकरणाचा रस्ता आहे़ मात्र या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली असून दोन पूल खचलेले आहेत. रस्ता झाडाझुडपांनी व्यापला आहे़ येथील बेघर वस्तीतील ग्रामस्थ मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र तूर्तास ग्रामस्थ या रस्त्याचा उपयोग केवळ शौच विधीला जाण्यासाठीच करीत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र घाण पसरलेली असते़ ग्रामस्थांनी या रस्त्यावर शेणखताचे ढिगारे टाकून रस्ता अतिक्रमीत केला आहे़ त्यामुळे आश्रमशाळेला लागणारे साहित्य रस्त्याअभावी पोहोचविणे कठीण झाले आहे. याबाबत शालेय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे़ या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)
आश्रमशाळा रस्त्याची दुरवस्था
By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST