आर्णी मतदार संघात भाजपला ५७ हजारांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:07 IST2019-05-24T22:05:46+5:302019-05-24T22:07:03+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंसराज अहीर यांना एक लाख २६ हजार ६४८ तर कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना ६८ हजार ९५७ मते मिळाली.

आर्णी मतदार संघात भाजपला ५७ हजारांची आघाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंसराज अहीर यांना एक लाख २६ हजार ६४८ तर कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना ६८ हजार ९५७ मते मिळाली. वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना नऊ हजार ६८० मतांवर समाधान मानावे लागले.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी व आर्णी या सहाही विधानसभा मतदार संघापैकी आर्णी मतदार संघातून भाजपला तब्बल ५७ हजार ६९६ मतांची आघाडी मिळाल्यामुळे आर्णी मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा या सर्वच विधानसभा क्षेत्रात हंसराज अहीर यांना फटका बसला आहे. या एकाही मतदार संघात अहीरांना आघाडी घेता आली नाही.
हंसराज अहीर यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी त्यांच्या मतदारसंघातून अहीर यांना मोठी आघाडी मिळवून दिल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. आर्णी मतदार संघातील आर्णी, घाटंजी, पांढरकवडा या तीन तालुक्यातील गावांमध्ये हंसराज अहीर व राजू तोडसाम यांनी आपआपल्या निधीतून तसेच विविध योजनांतून मतदार संघात केलेली विकास कामे, यामुळे ग्रामीण भागातील मतदारांनी अहीरांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
तोडसाम यांच्या उमेदवारीचा मार्ग झाला मोकळा
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी केवळ आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९६ मतांची आघाडी घेतल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार राजू तोडसाम यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.