अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:42 IST2025-04-19T18:41:20+5:302025-04-19T18:42:05+5:30

Yavatmal : ११ एप्रिलचे पत्र प्रियंका टिकले यांना १८ एप्रिलला देण्यात आले.

Anganwadi worker and helper recruitment in the midst of controversy | अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती वादाच्या भोवऱ्यात

Anganwadi worker and helper recruitment in the midst of controversy

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी:
येथील एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून मार्च महिन्यात करण्यात आलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भरती प्रक्रियेत सर्व नियुक्त उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी काही उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.


भालर अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज करणाऱ्या प्रियंका मनोहर टिकले यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, वणी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत भालर येथे अंगणवाडी सेविकेच्या दोन रिक्त पदांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानुसार प्रियंका टिकले यांनी अंगणवाडी सेविकेच्या जागेसाठी अर्ज केला होता. त्यांच्या कागदपत्रावरून त्यांना ६७ टक्के गुण मिळाले आहे. वणी येथील प्रकल्प कार्यालयाने शासन निर्णय पायदळी तुडवून स्वतःच्या मर्जीने वाटेल, त्या पद्धतीने डावलल्याचा आरोप प्रियंका टिकले यांनी केला आहे. टिकले यांनी भालर येथील स्नेहल विजय लाडे यांच्या अर्जावर तथा कागदपत्रावर आक्षेप दाखल केलेला होता. त्या आक्षेपामध्ये दोन क्रमांकावर असलेल्या संबंधित महिलेची मूळ कागदपत्रे मला दाखवावी, अशी मागणी असताना संबंधित कार्यालयाने मला लेखी व तोंडी व फोनवर अशी कोणतीही माहिती न देता १६ एप्रिल रोजी सुधारित अंतिम यादी न लावता स्नेहल विजय लाडे यांची अंगणवाडी सेविकापदी निवड झाल्याचा आदेश दिला. हा आदेश रद्द करून माझ्या समक्ष कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी प्रियंका टिकले यांनी केली आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता मला कार्यालयात न बोलावता माझ्या घरी ११ एप्रिलचे पत्र पाठविले. ज्यात माझा आक्षेप निकाली काढला असल्याची माहिती देण्यात आली. जेव्हा मला कागदपत्रे दाखविली नाही, तर आक्षेप कसा निकाली काढला. ११ एप्रिलचे पत्र १८ ला का दिले, असा सवाल प्रियंका टिकले यांनी केला आहे.


आर्थिक उलाढालीची चर्चा
अंगणवाडी भरतीत राजकीय हस्तक्षेपाच्या नेहमीच चर्चा झालेल्या आहेत. आता पदाधिकारी नसले, तरी गावातील स्थानिक राजकारणी शिफारस करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच या भरतीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही चर्चा आहे. यामुळे प्रक्रिया वादात अडकण्याची शक्यता आहे.


"भालर अंगणवाडी सेविकेसाठी ज्या दोन महिला टॉपवर होत्या, त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रियंका टिकले यांना बोलविण्यात आले होते, पण त्या आल्या नाहीत. निवड प्रक्रिया नियमानुसारच झाली आहे."
- सुरेखा तुराणकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी.

Web Title: Anganwadi worker and helper recruitment in the midst of controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.