शेकोटीजवळ बसलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू
By सुरेंद्र राऊत | Updated: January 8, 2023 20:46 IST2023-01-08T20:46:21+5:302023-01-08T20:46:43+5:30
कडाक्याची थंडी सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण शेकोटीचा आधार घेतात.

शेकोटीजवळ बसलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू
मारेगाव (यवतमाळ) : कडाक्याची थंडी असल्याने घराशेजारील मोकळ्या जागेवर नेहमीप्रमाणे शेकोटी पेटवून शेकत असताना एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील मांगली येथे शनिवारी सकाळी घडली. शकुंतला पुंडलिक भोयर असे मृत वृद्धेचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणाचा पारा घसरला आहे. कडाक्याची थंडी सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आबालवृद्धांसह सामान्य नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. अशातच शनिवारी सकाळी शकुंतला भोयर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर शेकोटी पेटवून ती शेकत होती. यावेळी अचानक तिच्या अंगावर असलेल्या ब्लॅंकेटला आग लागली.
आगीने चांगलाच भडका घेतला. शकुंतला ही रस्त्याशेजारील मोकळ्या जागेवर शेकोटी करून शेकत असल्याने ही घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यानंतर तिने जोराने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर तिला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अशातच उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे मुलगा, सून, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.